
पुणे ज्या शहराला एकेकाळी ‘विद्येचे माहेरघर’ आणि ‘सुसंस्कृत’ अशी ओळख होती, ते आता गुन्हेगारीच्या विळख्यात सापडले आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे पुणेकरांना आता ‘पुणे तिथे गुन्हेच गुन्हे’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. पोलिसांचा गुन्हेगारांवर आणि गृहखात्याचा पोलिसांवर वचकच न राहिल्याने कधी काळी शांत असलेले पुणे आता कमालीचे अशांत बनले आहे. पुण्यातील भाईगिरी का वाढतेय, याचे उत्तर गृहखाते सांभाळणाऱ्या देवाभाऊंना नाही तर कुणाला विचारायचे? असा संतप्त सवाल सामना अग्रलेखातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून पुण्यातील तळजाई टेकडीवर घडलेल्या घटनेवरुन टीका करण्यात आली. पुण्यात दिवसेंदिवस वाढणारी गुन्हेगारी पाहता, या शहराची मूळ ओळखच पुसून जाईल अशी भीती निर्माण झाली आहे. पोलिसांचा गुन्हेगारांवर आणि गृहमंत्रालयाचा पोलिसांवर वचक नसल्याने एकेकाळी शांत असलेले पुणे आता अशांत झाले आहे. खून, मारामाऱ्या, बलात्कार, खंडणी वसुली यांसारख्या घटनांनी पुण्यात गुंड टोळ्यांची दहशत वाढवली आहे. शहराच्या विविध भागांत गुन्हेगारांच्या टोळ्यांनी आपले राज्य स्थापन केले आहे, असा आरोप करण्यात आला आहे.
तळजाई टेकडीवर घडलेली ताजी घटना ही पुणे पोलिसांसाठी अत्यंत लांछनास्पद आहे. पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या दीडशे ते दोनशे तरुण-तरुणींना सुमारे 50-60 पैलवान गुंडांच्या टोळक्याने धक्काबुक्की केली आणि मारहाण केली. या गुंडांनी मुलींना शिवीगाळ केली आणि त्यांना बाजूला जाण्यास सांगितले. प्रशिक्षणार्थी मुलांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही बेदम मारहाण करण्यात आली. महाराष्ट्राच्या पोलीस दलात नोकरी मिळवण्यासाठी प्रशिक्षण घेणाऱ्या मुलींवर हात टाकताना या गुंडांना ना जनाची, ना मनाची लाज वाटली. इतकेच नाही, तर त्यांना पोलिसांचे भयदेखील वाटले नाही. गुन्हेगारांच्या मनातील भीती संपुष्टात येणे हे पोलीस प्रशासनाचे आणि पर्यायाने राज्याच्या गृहखात्याचे म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अपयश आहे, असे सामना अग्रलेखात म्हटले आहे.
या घटनेनंतर पुणे पोलिसांनी तातडीने कारवाई केली नाही. पीडित मुले-मुली सहकार नगर पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन गेल्यानंतरही पोलिसांनी त्यांची दखल घेतली नाही. पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडूनही पोलिसांनी त्यांना दाद दिली नाही. अखेर पोलीस आयुक्तालयात धडक दिल्यानंतर, घटनेच्या जवळपास 11 तासांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या गुंड टोळक्याविरुद्ध कारवाई करू नये, यासाठी थेट मंत्रालयातूनच पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव होता, अशी माहिती आता पुढे येत आहे. सरकारमधील लोकच अशा पद्धतीने गुन्हेगारांच्या टोळ्यांना वाचवण्याचे काम करत असतील, तर पोलिसांना तरी दोष देऊन काय उपयोग? असा सवालही सामनातून उपस्थित करण्यात आला आहे.
पुण्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सात नवीन पोलीस ठाणी सुरू होत आहेत. जर राज्यकर्त्यांच्या आदेशानुसार पोलीस गुन्हेगारांच्याच पाठीशी उभे राहत असतील, तर नवीन कितीही पोलीस ठाणी सुरू झाली तरी त्याचा काय उपयोग, ‘देवाभाऊं’चे गृहखाते पुण्यातील ही ‘भाईगिरी’ संपवणार आहे का? असा थेट सवाल देवेंद्र फडणवीसांना विचारत जोरदार निशाणा साधला आहे.