व्हायरल चॅट्स, दोन नावांचा उल्लेख अन्…; सरवणकरांच्या पराभवामागे भाजपच्या दोन बड्या नेत्यांचा हात?

समाधान सरवणकर यांनी आपल्या पराभवासाठी भाजपमधील दोन स्थानिक नेत्यांवर निशाणा साधला आहे. व्हायरल व्हॉट्सॲप चॅट्सच्या माध्यमातून युतीमध्ये गद्दारी झाल्याचा दावा करण्यात आल्याने मुंबईतील राजकारण तापले आहे.

व्हायरल चॅट्स, दोन नावांचा उल्लेख अन्...; सरवणकरांच्या पराभवामागे भाजपच्या दोन बड्या नेत्यांचा हात?
samadhan sarvankar
| Updated on: Jan 22, 2026 | 11:32 PM

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालाने महायुतीमधील स्थानिक स्तरावरील संघर्ष उघड केला आहे. शिवसेना शिंदे गट उमेदवार समाधान सरवणकर यांनी प्रभाग क्रमांक १९४ प्रभादेवी-माहीम मधून महापालिका निवडणूक लढवली होती. यावेळी समाधान सरवणकर यांनी आपल्या पराभवासाठी भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर गंभीर आरोप केले आहेत. समाधान सरवणकर यांनी कोणत्याही नेत्याचे थेट नाव न घेता भाजपमधील एका विशिष्ट टोळीने जाणीवपूर्वक गद्दारी केल्याचा दावा केला आहे.

व्हॉट्सॲप चॅटने वाढवली खळबळ

समाधान सरवणकर यांच्या काही कार्यकर्त्यांनी केवळ तोंडी आरोप न करता प्रसारमाध्यमांसमोर काही खळबळजनक व्हॉट्सॲप चॅट्सचे स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत. या व्हायरल चॅट्समध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना काही सूचना दिल्याचा दावा समाधान सरवणकर यांनी केला आहे. समाधान सरवणकर यांच्या मते, भाजपमधील एका विशिष्ट टोळीने युतीधर्माला हरताळ फासला. वरच्या पातळीवर युती असली तरी खालच्या स्तरावर मात्र मला पाडण्यासाठी ही टोळी सक्रिय होती, असे त्यांनी म्हटले आहे.

या व्हायरल झालेल्या चॅट्समध्ये समाधान सरवणकर कुटुंबाचे काम करू नका आणि माझं नाव सांगा आणि काम करू नका असे संदेश कार्यकर्त्यांमध्ये फिरत होते, असा दावा करण्यात आला आहे. जर सरवणकर निवडून आले तर भाजपचे अस्तित्व धोक्यात येईल, अशी भीती कार्यकर्त्यांमध्ये पसरवून त्यांना मतदानापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न झाला. या टोळीने युतीधर्म न पाळता विरोधी उमेदवाराला पडद्यामागून रसद पुरवल्याचा गंभीर आरोपही समाधान सरवणकर यांनी केला आहे.

समाधान सरवणकर यांनी जितेंद्र राऊत किंवा अक्षता तेंडुलकर यांचे थेट नाव घेतले नसले, तरी व्हायरल झालेले चॅट्स आणि स्थानिक चर्चेमुळे त्यांचा रोख याच दोन नेत्यांकडे असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. समाधान सरवणकर यांनी नाव न घेता केलेल्या या आरोपांमुळे भाजपच्या गोटात तीव्र पडसाद उमटले आहेत. समाधान सरवणकर यांनी केलेले हे आरोप अक्षता तेंडुलकर यांनी फेटाळून लावले आहेत. स्वतःचा पराभव पचवता येत नसल्याने समाधान सरवणकर भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांची बदनामी करत आहेत, असे तेंडुलकर यांनी म्हटले आहे. भाजपने याप्रकरणी आक्रमक पवित्रा घेत खोटे स्क्रीनशॉट्स व्हायरल केल्याबद्दल समाधान सरवणकर यांच्या विरोधात सायबर सेलमध्ये तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान वरिष्ठ पातळीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संबंध सलोख्याचे असले तरी, दादर-माहीम सारख्या बालेकिल्ल्यात कार्यकर्त्यांमधील हा वाद महायुतीसाठी चिंतेची बाब आहे. समाधान सरवणकर यांनी या संपूर्ण प्रकाराची तक्रार थेट देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे स्पष्ट केले असून, यामुळे मुंबईतील स्थानिक राजकारण चांगलेच तापले आहे.