Khavdya Dongar Case : त्याच्या डोक्यात फावडं घातलं, खवड्या डोंगर मृत्यू प्रकरणात सर्वात धक्कादायक ट्विस्ट, कुणालच्या मावशीच्या मोठा गौप्यस्फोट!
Khavdya Dongar Death Case : सध्या घडलेल्या घटनेबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. परंतु सध्या आम्हाला या दुःखातून सावरण्यासाठी थोडा वेळ द्या, अशी कळकळीची विनंती पल्लवी जऱ्हाड यांनी केली आहे.

ज्ञानेश्वर लोंढे, टीव्ही 9 मराठी, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावरील चांदगुडे कुटुंबाच्या मृत्यू प्रकरणात आता आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. मृत मुरलीधर चांदगुडे यांच्या आईने कुणालची आई संगीता चांदगुडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. संगीता यांनी आपल्या मुलाला तब्बल वीस वर्षांपासून आमच्यापासून दूर ठेवल्याचा दावा मुरलीधर चांदगुडे यांच्या आईने केला होता. आता याच आरोपांना संगीता चांदगुडे यांची बहीण आणि कुणालची मावशी पल्लवी जऱ्हाड यांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
डोक्यात फावडं का टाकलं होतं?
सध्या घडलेल्या घटनेबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. परंतु सध्या आम्हाला या दुःखातून सावरण्यासाठी थोडा वेळ द्या, अशी कळकळीची विनंती पल्लवी जऱ्हाड यांनी केली आहे. सोबतच, वीस वर्षांपूर्वी मुलाने गाव आणि शेत सोडावं म्हणून त्याच्या डोक्यात फावडं का टाकलं होतं? त्या वेळी तुमच्या मुलाच्या जीवाचं काय होईल, याचा विचार केला नव्हता का? असा थेट सवालही पल्लवी जऱ्हाड यांनी मुरलीधर चांदगुडे यांच्या आईला केला आहे.. या आरोप-प्रत्यारोपांमुळे खवड्या डोंगर प्रकरणाला आता कौटुंबिक वादाची किनार असल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुरलीधर चांदगुडे यांच्या आईने काय आरोप केले होते?
tv9 मराठीचे पत्रकार मुरलीधर चांदगुडे यांच्या मुळगावी अंबड तालुक्यातल्या धनगर पिंपळगाव येथे पोहोचले. यावेळी मुरलीधर चांदगुडे यांच्या आईने गंभीर आरोप केले होते. तो (मुरलीधर चांदगुडे) जास्त बोलत नव्हता. त्याची बायको (संगीता चांदगुडे) आम्हाला त्याला बोलू द्यायची नाही. तिने कधी बोलू दिले नाही. तिने त्याला दूर केले, असा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर आता सांगीता चांदगुडे यांच्या बहिणीनेही समोर येत चांदगुडे कुटुंबावर खळबळजनक आरोप केले आहेत. त्यामुळे आता हे प्रकरण काय वळण घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.