मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली, छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल
मराठा आरक्षणासाठी दिवसरात्र मेहनत करणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे. मनोज जरांगे यांना छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
महाराष्ट्रात सध्या उन्हाचा कडाका प्रचंड वाढला आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकांमुळे राजकारण तापत आहे. विविध पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची भर उन्हात प्रचारसभा होत आहे. भर उन्हात रॅली निघत आहे. तर दुसरीकडे उन्हाचा कडाकादेखील तितकाच भयंकर बघायला मिळतोय. या उन्हाच्या कडाक्यामुळे अनेकांना उष्माघाताचा त्रास होतोय. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांना प्रचारसभेत चक्कर आल्याची घटना घडली होती. त्यानंतर यवतमाळमध्ये आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भोवळ आली. यानंतर आता मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे विविध राज्यांचा दौरा करत आहेत. जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी सभा घेत आहेत. त्यांनी याआधी कित्येक दिवस उपोषण केलं आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षणाचा कायदा लागू झाला आहे. पण तरीही मनोज जरांगे पाटील सगे-सोयरेच्या मुद्द्यावर ठाम आहेत. मनोज जरांगे महाराष्ट्रात ठिकठिकाणी जावून मराठा समाजाच्या नागरिकांना आवाहन करत आहेत. त्यांच्यासमोर आपली भूमिका मांडत आहेत. या दरम्यान बीडच्या दौऱ्यादरम्यान त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळत आहे.
जरांगेंवर छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात उपचार
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली आहे. मनोज जरांगे पाटील यांना छत्रपती संभाजीनगरच्या गॅलक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मनोज जरांगे पाटील बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान अचानक त्यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना आता छत्रपती संभाजीनगरच्या गॅलक्सी रुग्णालयात आणण्यात आलं आहे. त्यांच्यावर आता उपचार सुरु आहेत.
मनोज जरांगे यांना याआधीदेखील छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उपोषणामुळे मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना याआधी गॅलक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण ते सध्या उपोषणाला बसले नव्हते. त्यामुळे त्यांना उन्हाचा त्रास झाल्याचा अंदाज आहे. मनोज जरांगे लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना त्यांच्या समर्थकांकडून आणि समस्त मराठा समाजाकडून केली जात आहे.