“भाजपची सागरवरची बैठक ही त्यांची अंतर्गत”;त्यामुळे आमच्यात आणि भाजपमध्ये मतभेद…

| Updated on: Jun 04, 2023 | 4:12 PM

कालचा झटका त्यांना बसलेला आहे आणि आता संजय राऊत संयमाने बोलतील चांगलं बोलतील, अशी अपेक्षा करणं जरी चुकीचं असलं तरी पण अपेक्षा करूया असंही त्यांनी यावेळी म्हटले.

भाजपची सागरवरची बैठक ही त्यांची अंतर्गत;त्यामुळे आमच्यात आणि भाजपमध्ये मतभेद...
Follow us on

औरंगाबाद : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर झालेली आणि आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सागरवर फक्त भाजप नेत्यांची बैठक झाल्याने आता युतीमध्ये नेमकं काय चाललं आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्या बैठकीविषयी आज आमदार संजय शिरसाठ यांनी बोलताना स्पष्ट केले की, काल झालेली बैठक ही भाजपची होती मात्र मुंबई महानगरपालिका निवडणुकीविषयी चर्चा होऊन या निवडणुकीत युतीच्या जागांबाबत चर्चा करण्यात आली आहे.
आमदार संजय शिरसाठ यांनी सांगितले की, सागर बंगल्यावर भाजपची बैठक ही त्यांची अंतर्गत बैठक होती आणि त्यांचा संकल्प आहे. 151 जागा मुंबई महापालिकेत आणण्याचे टार्गेट त्यांनी ठरवले आहे आणि त्या मिळवण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न केले जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

आमदार आशिष शेलार यांनी स्पष्ट सांगितले आहे की मुंबई महापालिकेच्या जागा आम्ही भाजपा-शिवसेना मिळवून लढवणार आहोत. त्याचबरोबर आमच्या सोबतचे म्हणजे शिवसेना- भाजपा युती सोबतचे मिळून हा आकडा असणार आहे.

शिवसेना आणि भाजपा मिळून 151 चा आकडा गाठणार आहोत, आणि हा आकडा शिवसेना-भाजप म्हणून आम्ही लढवणार असून आमच्यात आणि भाजपमध्ये कोणतेही मतभेद नाहीत असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

तर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत, त्याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री दिल्लीला गेले आहेत केवळ मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी गेले आहेत असं नाही. मात्र या दौऱ्यामध्ये तोही एक मुद्दा असू शकतो.

मुख्यमंत्री हे राज्यांमधील जे प्रकल्प थांबले आहेत, त्यांना ग्रीन सिग्नल मिळावे म्हणून आणि आमच्याकडे असलेल्या कालावधीमध्ये हे प्रकल्प कसे पूर्ण होतील यासाठी त्यांनी दिल्ली दौऱ्यावर असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

या दौऱ्याला केवळ राजकीय स्वरूप नाही तर महाराष्ट्राच्या विकासासाठी पंतप्रधान मोदी भरघोस मदत देतील यासाठी त्यांनी दिल्ली दौरा केला असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

संजय राऊत काल त्र्यंबकेश्वरला गेले होते. तिथे दर्शन घेतले म्हणून त्यांच्या झालेला हा परिणाम आहे. त्यांनी दर आठवड्याला त्र्यंबकेश्वरला गेले पाहिजे. संजय राऊत यांनी चांगले बोलले पाहिजे कशासाठी वाईट बोलता असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. तसेच तुम्ही इतरांना शिव्या देऊन स्वतःला शिव्या ऐकण्याची सवय का लावून घेतली असा खोचक सवालही त्यांनी केला आहे.

कधी कधी आम्हालाही असे वाटते की आम्ही राजकारणात येऊन काही चूक केली काय, म्हणून चांगले बोलले की लोक तुम्हाला स्वीकारतात. तुमच्या तोंडात नेहमीच घाण असेल तर लोकही त्याच पद्धतीने तुम्हाला उत्तर देतील असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे. काल जर नाशिकला बघितले संजय राऊत जे “वन मॅन आर्मी” पळत होते.

लोक त्यांच्या मागे लागले होते आणि हे पळत होते. हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. कालचा झटका त्यांना बसलेला आहे आणि आता संजय राऊत संयमाने बोलतील चांगलं बोलतील, अशी अपेक्षा करणं जरी चुकीचं असलं तरी पण अपेक्षा करूया असंही त्यांनी यावेळी म्हटले. संजय राऊत यांच्या तोंडातून काही चांगले शब्द ऐकण्याची जी महाराष्ट्राला आस आहे ती पूर्ण होईल अशी मला अपेक्षा आहे असेही संजय शिरसाठ म्हणाले.