
BJP Candidate displeasure: एबी फॉर्म दाखल होण्यास आता अवघे दोन तास शिल्लक राहिले आहे. महायुती तुटल्यानंतर आपल्याला सहज उमेदवारी मिळेल, असे निष्ठावंतांना वाटत होते. पण त्याचवेळी तिकीट कापल्याचे समोर आल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री अतुल सावे यांच्या कार्यालयाबाहेर मोठा हायहोल्टेज ड्रामा रंगला. गेल्या कित्येक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिल्यावर सुद्धा उमेदवारी न मिळाल्याने महिला उमेदवारांनी मोठा गदारोळ घातला. तर काही पुरुष उमेदवारांनी बाहेर टाकलेल्या पेंडॉलमध्येच ठिय्या दिला. यावेळी महिलांना भोवळ आली. वॉर्ड क्रमांक 22 मध्ये इच्छुकांना उमेदवारी नाकारल्याने उमेदवाराला अश्रू अनावर झाले. तर त्याच्या पत्नीला भावना आवरता आल्या नाही. तर दुसरीकडे इतर वॉर्डातील महिला उमेदवाराने सुद्धा मोठा राडा घातला. लता दलाल या भाजपच्या अत्यंत जुन्या कार्यकर्त्या आहेत. त्यांना सुद्धा तिकीट नाकारण्यात आल्याचे समोर येत आहे. त्यामुळे यावेळी अनेक जणांनी पक्षाविरोधात घोषणाबाजी केली. एकनिष्ठ असूनही AB फॉर्म नाकारल्याने या उमेदवारांनी टाहो फोडला. त्यातील अनेकांनी भाजप रसातळाला चालल्याचा आरोप केला.
पैसे घेऊन तिकीट वाटपाचा आरोप
यातील महिला उमेदवाराने पैसे घेऊन तिकीट वाटप झाल्याचा आरोप केला. गेल्या 15 वर्षांपासून भाजपसाठी राबराब राबलो. पण आता तिकीट वाटपाच्या वेळी पक्षात नवीन आलेल्यांना उमेदवारी देण्यात आली. पैसे घेऊन हे तिकीट वाटप झाल्याचा आरोप यावेळी तिकीट कापलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी पक्षावर केला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. मंत्री अतुल सावे यांची भेट घ्यायची असल्याचा आग्रह या कार्यकर्त्यांनी धरल्याने पोलिसांनी त्यांना थांबवले. त्यावरुन मग संताप उडाला. उमेदवारांचा पारा पडला. त्यांनी भाजपविरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्याचवेळी नेत्यांवर गंभीर आरोप केले. पक्ष निष्ठावंतांना डावलल्याने त्रागा केला. या उमेदवारांना थोपवण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.
महिलेला आली भोवळ
यावेळी शिवाजीनगर परिसरातून उमेदवारीसाठी आलेल्या महिलेला भोवळ आली. तिला अश्रू अनावर झाले. आपण पक्षाच्या कार्यक्रमात झोकून देऊन काम केले. रक्त आटवून आम्ही पक्षासाठी झटलो. कालपर्यंत आम्हाला उमेदवारी देणार असे सांगत होते. पण वेळेवर तिकीट कापले. आम्ही पक्षासाठी कोर्ट केसेस अंगावर घेतल्या. अनेक गुन्हे अंगावर घेतले आणि आता आम्हाला डावलून पैसे देणाऱ्यांना तिकीट वाटप करण्यात आल्याचा आरोप इच्छुकांनी नेत्यांवर केला.
बंडखोरी उफाळणार
दरम्यान अनेक जुन्या कार्यकर्त्यांना सुद्धा उमेदवारी नाकारल्याने छत्रपती संभाजीनगरमध्ये बंडखोरी उफळण्याची शक्यता आहे. अनेकांनी पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर अपक्ष लढणार असल्याचे जाहीर केले. तर एका महिला उमेदवाराने आता भाजप उमेदवाराला पाडणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील अनेक वॉर्डात शिवसेना आणि इतर विरोधकांपेक्षा या बंडखोरांचाच मोठा ताप पक्षाला झाल्याचे दिसून येत आहे. या बंडोबांना शांत करण्याचे मोठे आवाहन पक्षासमोर आहे.