
मंत्री संजय शिरसाट यांची ग्रहदशा ठीक नसल्याचे समोर येत आहे. त्यांच्या सामाजिक खात्याचा निधी लाडकी बहीण योजनेकडे वळवण्यात आल्याने ते नाराज आहे. तर वेदांत हॉटेल प्रकरणात उद्धव ठाकरे सेनेने एकंदरीत व्यवहाराचावरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. हा वाद शमत नाही तोच आता माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेत शिरसाट यांच्यावर आरोपांची राळ उडवून दिली. त्यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.
काय आहे ते जमिनीचे प्रकरण?
एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर इम्तियाज जलील यांनी गंभीर आरोप केले आहेत. मंत्रिपदाचा फायदा घेऊन शिरसाटांनी मुलाच्या नावे एमआयडीसीत जागा, जमीन घेतल्याचा दावा त्यांनी केला. Cameo डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड या सिद्धांत शिरसाट यांच्या कंपनीला जागा देण्यात आली. हा प्रोजेक्ट 105 कोटी 89 लाख रुपयाचा आहे. इतके पैसे आले कुठून असा सवाल जलील यांनी केला आहे.
26 कोटी सिद्धांत शिरसाठ देणार असे अधिकृत कागदावर लिहिलेले आहे. बँक लोन 79 करोड 42 लाख घेणार असे नमूद आहे. शेंद्रा एमआयडीसीमध्ये शिरसाट यांनी ही जागा घेतली आहे. तिथे ते एक लिकर फॅक्टरी, दारू कंपनी उघडणार आहे.
या कंपनीसाठी 21 हजार 275 स्क्वेअर मीटर जागा घेतली आहे. जवळपास पाच एकर जागा सिद्धांत शिरसाट यांना देण्यात आली आले. ही जागा त्यांनी 6 कोटी 9 लाख 40 हजार 200 रुपयात विकत घेतली आहे. ही जागा ट्रक टर्मिनल साठी होती, मात्र डी रिझर्व्ह करून घेण्यात आल्याचा आरोप जलील यांनी शिरसाट यांच्यावर केला.
कंपनीबाबत असा केला खुलासा
Cameo डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीबाबत जलील यांनी खुलासा केला आहे. त्यानुसार, सिद्धांत शिरसाट, अमिन भावे आणि संजय शिरसाट यांच्या पत्नी असे तीन संचालक होते. भावे हे मोठे बिल्डर आहेत. त्यांच्या नावाचा केवळ वापर करण्यात आला. जेव्हा या कंपनीला जागा मंजूर करण्यात आली. तेव्हा भावे यांनी संचालक पदावरून नोव्हेंबर 2023 मध्ये राजीनामा दिला.
आता या कंपनीत मंत्री महोदयांच्या पत्नी विजया शिरसाट आणि मुलगा सिद्धांत शिरसाठ हे दोघेच डायरेक्टर राहिले आहेत. त्यांच्या पत्नीने संचालक होण्यासाठी अधिकृतपणे दोन लाख रुपये भरले आहे. विजया शिरसाट या गृहिणी आहेत. मंत्री संजय शिरसाट यांनी उत्पन्नाचे साधन बिल्डरशीप, आणि शेतीतून दाखवले आहे. मंत्री कुठली कंत्राट घेतात. एका लोकप्रतिनिधी असताना बिल्डरशिप करतात. शिरसाटांच्या पत्नीचे 25 लाख वार्षिक उत्पन्न असताना युको बँकेने त्यांना 5 कोटी 65 लाख 330 हजार कर्ज दिले. सिक्युअर लोन मिळून त्यांच्या नावे 12 कोटी 56 लाख 53 हजार 13 इतके कर्ज असल्याचे जलील म्हणाले.
मंत्री उदय सामंत यांचा समावेश
पालकमंत्री असताना सुभाष देसाई यांनी संपूर्ण चिकलठाणा विकून खाल्ला असा आरोप जलील यांनी केला. तर यापूर्वीचे छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शहरातील चिकलठाणा हा भाग विकून खाल्ला आहे. मी देसाई यांना देखील आवाहन करतो, त्यांनी मला त्यावेळी मानहानीचा दावा करेल म्हटले होते. मी त्या नोटीसची वाट पाहत आहे.मला नोटीस पाठवावी, असे आव्हान त्यांनी दिले.
आताचे पालकमंत्री संजय शिरसाट यांना देखील आवाहन करतो, या प्रकरणात बोलताना सांभाळून बोला, माझ्याकडे सर्व पुरावे आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी त्या जागेवर शाळा बांधवी. या प्रकरणी मी MIDC प्रशासन, सीआयडी, ED, आयकर विभाग, मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे जलील म्हणाले. हे प्रकरण मुख्यमंत्र्यांनी सीबीआयकडे चौकशीसाठी द्यावे , अशी मागणी त्यांनी केली.