समृद्धी महामार्गावर कार, अचानक टायर फुटला अन् 3 जण…; शेवटचा व्हिडीओ पाहून कुटुंबिय हळहळले
समृद्धी महामार्गावर सिन्नरजवळ भीषण अपघात झाला आहे. कारचा टायर फुटल्याने कल्याणच्या बुकाणे कुटुंबातील बहीण, भाऊ आणि भावाची पत्नी ठार झाली आहे. यात ४ लहान मुले गंभीर जखमी झाले आहेत. यामुळे चिंचपाडा परिसरात शोककळा पसरली आहे.
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर सिन्नर तालुक्यातील पाटोळे शिवारात भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात कल्याण पूर्वेकडील चिंचपाडा येथील एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर चार लहान मुले गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव वेगातील कारचा टायर फुटल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे कल्याणमध्ये शोककळा पसरली आहे.
कारचा टायर फुटल्याने अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेकडील चिंचपाडा परिसरात राहणारे बुकाणे आणि घुसळे कुटुंबिय कामानिमित्त खासगी कारने प्रवास करत होते. मात्र अचानक सिन्नर तालुक्यातील पाटोळे जवळील समृद्धी महामार्गावर त्यांच्या कारचा टायर फुटला. यामुळे कार रस्त्याच्या कडेला आदळली आणि मोठा अपघात झाला. या दुर्घटनेत बहीण-भाऊ आणि भावाची पत्नी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. निलेश बुकाणे (भाऊ) आणि वैशाली घुसळे (बहीण) अशी या दोघांची नावे आहेत. तर तिसऱ्या मृत व्यक्तीची अद्याप पूर्णतः ओळख स्पष्ट झालेली नाही. परंतु त्या निलेश बुकाणे यांच्या पत्नी असल्याचे सांगण्यात येत आहे.
या अपघातात कारमधील चार लहान मुले गंभीर जखमी झाली आहेत. त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे. सध्या जखमींवर उपचार सुरु आहेत. त्यांच्यासाठी वैद्यकीय मदत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
शेवटचा व्हिडीओ पाहून हळहळले
निलेश बुकाणे आणि वैशाली घुसळे हे कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरातील रहिवासी होते. या घटनेमुळे संपूर्ण चिंचपाडा परिसरात आणि त्यांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे प्रवासाला निघताना या कुटुंबाने एक व्हिडीओ काढला होता. यात त्यांचे संपूर्ण कुटुंब आनंदात असल्याचे दिसत आहे. तसेच या गाडीत पाठीमागे बसलेली लहान मुलं मजा मस्ती करताना दिसत आहेत. सध्या त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यांचा हा व्हिडीओ अखेरचा ठरला आहे. मात्र या अपघातामुळे समृद्धी महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
ठाकरे बंधूंची युती कधी? राज यांच्या भेटीनंतर परबांनी स्पष्टच सांगितल..
निवडणुका जाहीर होताच राऊत राज ठाकरेंच्या भेटीला, 'शिवतीर्थ'वर खलबतं
महाराष्ट्रातील खासदारांकडून दिल्लीत जरांगेंची भेट, कारण नेमकं काय?

