ठाकरे गट आणि मनसेच्या युतीमुळे महाविकासआघाडीत बिघाडी? बड्या नेत्याच्या विधानामुळे खळबळ
एकीकडे ठाकरे गट आणि मनसेची युती होत असताना दुसरीकडे काँग्रेसने मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळत आहे. आता यावर ठाकरे गटाने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्रात येत्या १५ जानेवारीला महापालिका निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे. त्या अनुषंगाने राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच आता सध्या युती-आघाडीच्या घोषणा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गट आणि मनसेच्या संभाव्य युतीच्या चर्चांवर अखेर आता शिक्कामोर्तब होणार आहे. एकीकडे ठाकरे गट आणि मनसेची युती होत असताना दुसरीकडे काँग्रेसने मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळत आहे. आता यावर ठाकरे गटाने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी मनसे नकोस असा पावित्रा घेतला आहे. रिपाइंचे काही घटकही काँग्रेससोबत येण्यास इच्छुक आहेत. पण कायदा हातात घेऊन मारहाण करणारे, दडपशाही करणार्या पक्षांशी काँग्रेस आघाडी करणार नाही, असे विधान वर्षा गायकवाड यांनी केले होते. आता या विधानावर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत भाष्य केले.
अनिल परब काय म्हणाले?
वर्षा गायकवाड यांचं जे काही म्हणणं आहे, त्याबद्दल शेवटी आम्हाला या सर्व गोष्टींचा एकंदर विचार करुन निर्णय घ्यायचा आहे. ज्या दिवशी निर्णय होईल तेव्हा आम्ही तुम्हाला कळवू. आम्ही आजही महाविकासआघाडीत आहोत. आमचा आग्रह शेवटपर्यंत महाविकासआघाडी एकत्र राहावी, असा असणार आहे. आता वर्षा गायकवाड यांचं जे मत आहे, ते त्यांचं मत आहे. आमचं मत असं आहे की महाविकासआघाडीने एकत्र निवडणूक लढवली पाहिजे, असे अनिल परब म्हणाले.
हा निर्णय घेण्याचा अधिकार आम्हाला नाही
शिवसेनेची युती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत होत आहे. आम्ही आता महाविकासआघाडीसोबत आहोत. महाविकासआघाडी अभेद्य राहावी अशी आमची इच्छा आहे. आता यात काँग्रेस काय निर्णय घेतं हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. परंतु इच्छा, अपेक्षा, चर्चा आणि त्यातील अंतिम निर्णय यात फरक असतो. जेव्हा अंतिम निर्णय होईल, तेव्हा आम्ही तुम्हाला कळवू. काँग्रेससोबत चर्चा करायची की नाही करायची हा निर्णय आमचे वरिष्ठ नेते घेतील. हा निर्णय घेण्याचा अधिकार आम्हाला नाही, असेही अनिल परब यांनी सांगितले.
