
सांगली नगर परिषद, नगर पंचायत आणि नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल थोड्याच वेळात लागणार आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत सांगलीतील चित्र स्पष्ट होणार आहे. सांगलीत मुख्यमंत्र्यांपासून दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वच दिग्गजांच्या सभा झाल्या. महायुती आणि महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याने बहुतेक ठिकाणी सर्वच पक्ष स्वबळावर लढत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कुणाच्या बाजूने मतदार कौल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सांगलीचे धुरंधर कोण असतील हे काही क्षणात कळणार आहे.
शिराळा नगरपंचायत
शिराळा नगर नगरपंचायतीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही मध्ये बिघाडी झाली आहे.भाजपा-शिवसेना शिंदे आघाडी विरुद्ध दोन्ही राष्ट्रवादी आघाडी,अशी लढत होत आहे.भाजप- शिंदे शिवसेना आघाडी कडून शिवसेना शिंदे गटाचे युवा नेते पृथ्वीसिंग नाईक यांना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अभिजित नाईक उमेदवार आहेत. राष्ट्रवादी अजित पवार आघाडी विरुद्ध भाजपा शिवसेना शिंदे आघाडी अशी लढत होत आहे. माजी आमदार मानसिंगराव नाईक आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार शिवाजीराव नाईक यांनी आघाडी करत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडुन निवडणूक लढवत आहेत.
उरुण ईश्वरपूर नगरपरिषद
ईश्वरपूर नगर परिषदेसाठी महायुती विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार आघाडी अशी लढत होत आहे. जयंत पाटलांच्या विरोधात या ठिकाणी सर्व विरोधक एकवटले आहेत. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आनंदराव मलगुंडे आहेत तर माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र विश्वनाथ डांगे हे भाजपाचे उमेदवार आहेत. याठिकाणी दुरंगी अशी लढत होत आहे.
जत नगरपरिषद
जत नगरपरिषदेसाठी भाजपा स्वबळावर लढतोय, काँग्रेस आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट उद्धव ठाकरे गट अशी आघाडी आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा एक गट अशी आघाडी झालेली आहे. तर शिवसेना शिंदे गट या ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवत आहे. त्यामुळे चौरंगी अशी लढत या ठिकाणी होत असून भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी डॉक्टर रवींद्र आरळी राष्ट्रवादी अजित पवार गट आघाडी कडून माजी सभापती सुरेश शिंदे काँग्रेस आघाडीकडून बाजार समितीचे सभापती सुजय नाना शिंदे आणि शिवसेना शिंदे पक्षाकडुन सलीम गवंडी हे मैदानात आहेत.
विटा नगरपरिषद
विटा नगर परिषदेसाठी तिरंगी लढत होत आहे.महत्त्वाचे म्हणजे महायुतीमध्ये या ठिकाणी बिघाडी झाली आहे. या ठिकाणी महायुती मध्ये लढत होता आहे. भाजपा विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी प्रमुख लढत होत आहे. भाजपाकडून प्रतिभा चोथे या नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून काजल म्हेत्रे या तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून रोहिनी जंगम मैदानात आहेत. शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर आणि भाजपाचे नेते माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे
पलूस नगरपरिषद
पलूस नगर परिषदेसाठी तिरंगी लढत होत आहेत भाजपा स्वबळावर निवडणूक लढवत आहे ,तर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांचे युती झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार आणि उद्धव ठाकरे गट अशी महाविकास आघाडी असून नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून संजीवनी सुहास पुदाले, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाकडून ज्योत्स्ना येसुगडे आणि भाजपाकडून सोनाली नलवडे हे मैदानात आहेत.
तासगाव नगरपरिषद
तासगाव नगरपरिषदसाठी पंचरंगी लढत होत आहे. भाजपा आणि शिवसेना शिंदे गट या ठिकाणी एकत्रित लढत आहे. तर माजी खासदार संजयकाका पाटील यांनी स्वाभिमानी विकास आघाडी स्थापना करून निवडणूक लढवत आहेत तर आमदार रोहित पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आघाडी या ठिकाणी लढत असून काँग्रेस या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष देखील स्वबळावर निवडणूक लढवत आहेत. भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी विद्या धाबुगडे -चव्हाण तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून वासंती सावंत, तर संजयकाका पाटील यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीकडुन विजया पाटील, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून ज्योती पाटील आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून रंजना चव्हाण मैदानात आहेत. त्यामुळे याठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी पंचरंगी लढत होणार आहे.
आष्टा नगरपरिषद
आष्टा नगर परिषदेसाठी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत पार पडत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून शहर विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली जात आहे. या ठिकाणी स्वर्गीय माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या सुपुत्र विशाल शिंदे नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत आहेत. तर महायुतीमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून प्रवीण माने यांनी नगराध्यक्ष पदासाठी लढत होत आहे. त्यामुळे आष्टा नगरपरिषदेसाठी दुरंगी अशी लढत होत आहे
आटपाडी नगरपंचायत
पहिल्यांदाच आटपाडी नगरपंचायतीसाठी निवडणुका पार पडत आहेत. महायुती मध्ये उभी फूट पडली आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने लढत आहे. भाजपा स्वबळावर लढत आहे तर शिवसेना शिंदे गट हे देखील स्वबळावर लढत असून माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडी देखील मैदानात आहे. नगराध्यक्ष भाजपाकडून उत्तम जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर तीर्थक्षेत्र विकास आघाडी कडून सौरभ पाटील आणि शिवसेना शिंदे गटाकडुन रावसाहेब सागर हे मैदानात आहेत. या ठिकाणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि अमरसिंह देशमुख गट एकत्रित लढत आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर यांचा शिंदे शिवसेना लढत आहे.