
माझे नशीब उलटे सुलटे करण्याची अजून कुणाच्यात हिंमत नाही. माझे नशीब बदलणारा राजकीय पुढारी अजून जन्माला आला नाही. त्यामुळे काहीतरी कॉमेंट करून माझे नशीब कुणी बदलू शकत नाही. 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्य मला मिळेल आणि तिसऱ्यांदा मला खासदार होण्याची संधी भेटेल, असा विश्वास महायुतीचे सांगलीचे उमेदवार संजय काका पाटील यांनी व्यक्त केला आहे. सांगलीत आयोजित पत्रकार परिषदेत संजय काका बोलत होते. लीड कमी राहील. पण विजयाची नक्की खात्री आहे, असे म्हणत संजय काकांनी आमदार विश्वजित कदम यांच्या मी कुठल्या पाटलाच्या मागे उभा आहे हे 4 जूनला कळेल या विधानावर प्रतिक्रिया देत विश्वजीत कदम यांना एकप्रकारे आव्हान दिलं आहे.
सहानभूतीच्या जोरावर निवडणूक खेळता येते. पण फक्त सहानभूतीवर लोक मतदान करत नाहीत, असे म्हणत संजय काकांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनाही टोला लगावला आहे. याशिवाय महायुतीमध्ये राहून अनेक ठिकाणी आपल्या विरोधात काहीजणांनी काम केल्याचे देखील संजयकाकांनी सांगत ज्यांनी या निवडणुकीत रंगाचा बेरंग करण्याचा प्रयत्न केलाय त्याना रंग दाखवायची वेळ आलीय. ज्या महायुतीच्या नेत्यांनी विरोधात काम केले त्याची व्याजासकट परतफेड होईल असे म्हणत संजय काकांनी एक प्रकारे आपल्या विरोधात काम केलेल्यांना इशारा दिला आहे.
आपल्याला जिल्ह्यातील काही नेत्यांनी गुप्तपणे मदत केली आहे. हे खरे आहे का? असा प्रश्न संजय काकांना विचारला असता “कपटी मित्रापेशा दिलदार शत्रू चांगला तो कामाला आला”, असं म्हणत संजयकाकांनी जयंत पाटील यांचं नाव न घेता आपल्याला काही नेत्यांनी मदत केल्याचं एकप्रकारे मान्य केलं आहे.
टेंभू, ताकारी, म्हैसाळ या जिल्ह्यातील तीनही सिंचन योजनांसाठी पाण्याची कमतरता भासू देणार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आश्वासन दिले आहे, अशी माहितीही संजय काका पाटील यांनी दिली आहे. एकूण 12 टिमएमसी पाण्याची मागणी केली होती. त्यातील 8 टीमएमसी पाणी मंजूर झालं आहे. पण आणखी 4 टीएमसी पाणी मिळावी, अशी देखील मागणी आपण केल्याचं संजय काकानी सांगितलं आहे.