सांगलीत मोठी उलथापालथ! जयंत पाटलांना जबर धक्का; भाजपने 2 शिलेदार फोडले, अचानक चेकमेट
Sangli Politics : आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. 2 बड्या शिलेदारांसह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

गेल्या काही काळापासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पहायला मिळत आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपासून अनेक बड्या नेत्यांनी पक्षांतर केले आहे. आधी विधानसभा, त्यानंतर महापालिका आणि नंतर जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीत अनेक नेत्यांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश केल्याचे समोर आले आहे. तसेच निवडणुकीनंतरही काही नगरसेवक पक्षांतर करत असल्याचे पहायला मिळत आहे. आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या दोन नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
दोन नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश
सांगली महानगरपालिकेमध्ये भाजपाने राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का दिला आहे. जयंत पाटलांच्या जवळील 2 नगरसेवकांनी मुंबईमध्ये भाजपात प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचा उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सांगली महापालिकेचे नगरसेवक युवराज गायकवाड आणि सुरेश बंडगर या दोघांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे शरद पवार यांच्यासह जयंत पाटील यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
जयंत पाटील यांना मोठा धक्का
काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अवघे 3 नगरसेवक निवडून आले होते, त्यापैकी दोन नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेशा केल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटलांना हा मोठा धक्का मानला जात आहे. सांगली जिल्हा परिषदेमध्ये जयंत पाटलांनी, भाजपाला सत्तेपासून दूर ठेवत करेक्ट कार्यक्रम केला होता. त्याची परतफेड म्हणून महापालिकेत भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडत जयंत पाटलांना दणका दिल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
🪷 भाजपा पक्ष प्रवेश सोहळा, सांगली मिरज कुपवाड 🪷
📌 पक्ष प्रवेश करणारे मान्यवर –
सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) गटाचे नगरसेवक सुरेश लक्ष्मण बंडगर आणि नगरसेवक युवराज शिवाजीराव गायकवाड आदी.📌 उपस्थित मान्यवर –
मंत्री चंद्रकांत दादा पाटील,… pic.twitter.com/6zBXLTnGgO— Ravindra Chavan (@RaviDadaChavan) May 19, 2026
रविंद्र चव्हाण यांनी दिली पक्षप्रवेशाची माहिती
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या पक्ष प्रवेशाची माहिती दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत चव्हाण यांनी म्हटले की, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) गटाचे नगरसेवक सुरेश लक्ष्मण बंडगर आणि नगरसेवक युवराज शिवाजीराव गायकवाड यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, सांगली ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, सुमित कदम आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी चव्हाण यांनी भाजपा परिवारात प्रवेश करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.