क्लिनिकचा दरवाजा बंद करून… प्राध्यापक डॉक्टरकडून विद्यार्थिनीसोबत भयंकर प्रकार, संतापजनक घटनेनं खळबळ
बीडमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. एका प्राध्यापक डॉक्टरने विद्यार्थिनीचा छळ केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. नेमकं काय घडलं?

बीडमधील वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थिनीने प्राध्यापकाविरोधात गंभीर तक्रार दाखल केली आहे. चुकीचा स्पर्श, परीक्षेत कमी गुण देण्याची धमकी आणि फोन मेसेजद्वारे त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी नोटीस बजावत कारवाई केली आहे. २२ वर्षीय विद्यार्थिनीने प्राध्यापकाविरोधात पोलिसांत धाव घेतली आहे. जानेवारी २०२६ पासून गैरवर्तन आणि धमकावल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी प्राध्यापकाला नोटीस बजावली आहे.
नेमकं काय घडलं?
बीडमध्ये वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टरविरोधात विद्यार्थिनीने छळाची तक्रार दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. के.एस.के. होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयातील २२ वर्षीय विद्यार्थिनीने प्राध्यापक डॉ. अनिस अहमद यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. नियमित तपासणीसाठी गेल्यानंतर डॉक्टरांनी क्लिनिकचा दरवाजा बंद करून चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप विद्यार्थिनीने केला आहे.
विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसार, जानेवारी २०२६ पासून डॉक्टरांकडून वारंवार गैरवर्तन केले जात होते. याबाबत कुणाला सांगितल्यास परीक्षेत कमी गुण देण्याची, तसेच पाच वर्षे एकाच वर्गात ठेवण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. याशिवाय फोन आणि मेसेजद्वारे त्रास दिल्याचा आरोपही विद्यार्थिनीने केला आहे. या प्रकरणी २५ नोव्हेंबर २०२६ रोजी विद्यार्थिनीने पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपी प्राध्यापकाला नोटीस बजावण्यात आल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली. याप्रकरणी आता पुढे काय होणार याकडे लक्ष लागलं आहे.
CNG भरण्याच्या किरकोळ कारणावरून वाद, टोळक्यांची तुफान हाणामारी
केज शहरातील धारूर चौकातील देशमुख पेट्रोल पंपावर काल दुपारी शहरात दहशत पसरवणाऱ्या टोळक्याने दोन तरुणांवर लाठ्या-काठ्यांनी अचानक हल्ला चढवला. आरोपी CNG भरण्यासाठी नंबरने न येता थेट आले, नंबरने या असे म्हणाल्यावरून वाद झाला. यानंतर आरोपींनी ऋषिकेश बोबडे आणि अनिकेत बोबडे या दोघांवर हल्ला केला, यामध्ये दोन्ही तरुण जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. या प्रकरणात केज पोलिसात साहिल बाबा शेख, विकी लांडगे, बालु रांजनकर आणि अज्ञात एक अशा चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
