Harshal Patil : हर्षल पाटीलच्या आत्महत्येनंतर मंत्री गुलाबराव पाटील यांचा धक्कादायक दावा, मोठा टि्वस्ट

Harshal Patil : हर्षल पाटील या युवा कॉन्ट्रॅक्टरच्या आत्महत्येने राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. सरकारकडून बिलं निघत नसल्याने हर्षल पाटील आर्थिक दृष्टया अडचणीत आल्याच सांगण्यात येतय. त्यामुळेच त्याने जीवन संपवण्याचा मार्ग निवडला. यावर आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

Harshal Patil : हर्षल पाटीलच्या आत्महत्येनंतर मंत्री गुलाबराव पाटील यांचा धक्कादायक दावा, मोठा टि्वस्ट
Harshal Patil-Gulabrao Patil
| Updated on: Jul 24, 2025 | 11:29 AM

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील युवा कॉन्ट्रॅक्टर हर्षल पाटील यांच्या आत्महत्येनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. या आत्महत्येमुळे सरकारवर टीकेची झोड उठली आहे. अनेक ठेकेदार बिलं निघत नसल्याने आर्थिक अडचणीत असल्याचे समोर येत आहे. हर्षल पाटील हा तरुण शासकीय कंत्राटदार होता. तांदुळवाडी गावातील नागरीक आणि नातेवाईकांनी त्याच्याविषयी माहिती दिली. त्याने अगोदर कोल्हापूर जिल्ह्यात विविध शासकीय कामे केली. कोल्हापूरात चांगली कामे केल्याच्या जोरावर त्याला सांगली जिल्ह्यातही सरकारी कामे मिळाली. गावातीलच जल जीवन मिशनचे काम त्याने हाती घेतले. त्याच्या कामामुळे इतर गावातील नागरिकांनी, ग्रामपंचायतींनी त्याच्यामार्फत कामे करण्याची प्रशासनाकडे मागणी केली.

मंत्री गुलाबराव पाटील यांनी वाळवा येथील कॉन्ट्रॅक्टर हर्षल पाटील यांच्या आत्महत्येवर स्पष्टीकरण दिलं आहे. “हर्षल पाटील यांच्या नावावर कुठलीही काम नाहीत तसच त्या योजनेवर कुठलीही बिलं प्रलंबित नाहीत. सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांनी काम घेतलेली असावीत. मात्र त्याची जिल्हा परिषदेकडे नोंद नाही” असं स्पष्टीकरण मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलं आहे.

बवाल करू नये एवढीच आमची विनंती

जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपावर गुलाबराव पाटील म्हणाले की, “ही स्थिती फक्त महाराष्ट्र राज्याची नाही तर संपूर्ण देशाची आहे. 3800 कोटींचा प्रस्ताव आम्ही अर्थ व वित्त खात्याकडे दिलेला आहे. मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्र्यांशी बोलणं झालेलं आहे. ते काम करणार आहेत पण काही गोष्टीला थोडा उशीर लागतो. त्यामुळे थांबावं लागतं” “आतापर्यंतच्या कामाचे पैसे दिले आणि पुढच्या कामाचे पैसे मिळणार नाही असं होणार नाही. सरकार आहे, थोड्या गोष्टी मागे पुढे होत असतात. मात्र याचा बवाल करू नये एवढीच आमची विनंती आहे” असं गुलाबराव पाटील म्हणाले.

‘शेवटी कोणाचा तरी जीव गेला आहे’

“संजय राऊतने आधी पूर्ण तपास केला पाहिजे. अपूर्ण माहितीवर बोलू नये. नीट बोलावं. कुठल्या गोष्टी कशा बोलल्या पाहिजे हे त्यांनी ठरवावे.. कुठल्याही गोष्टी उठायच्या आणि बोलायच्या याला अर्थ नाही. शेवटी कोणाचा तरी जीव गेला आहे. सकाळी उठायचं आणि दहा वाजता कुठली माहिती न घेता बोलायचं. याला काय अर्थ नाही” असं गुलाबराव पाटील म्हणाले.