राज्यात पुन्हा भूकंप? एका आमदाराला 20 कोटींची ऑफर; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, नावही सांगितलं
Sanjay raut news : राज्यात फोडाफोडीचं राजकारण सुरूच असल्याचे दिसतंय. राज्यातील आणखी एका आमदाराला ऑफर मिळाल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

राज्यात आमदार-खासदार फोडाफोडीचं राजकारण सुरूच आहे. मागील काही दिवसांत दोन आमदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. त्याआधी शिंदे गटात ठाकरेंच्या 6 खासदारांनी प्रवेश केला. खासदार-आमदार पक्षांतर करू लागल्याने राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आता पुन्हा एका आमदाराला 20 कोटींची ऑफर दिल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. टॉलस्टॉयची कथा सांगताना संजय राऊत म्हणाले, ‘टॉलस्टॉय हा फार मोठा लेखक होता. तत्त्वचिंतक होता. रशियातील. भविष्यातील वेध घेण्याची शक्ती त्याच्या लिखाणात होती. त्याची गोष्ट प्रसिद्ध आहे. जास्त हावरटपणा, हव्यास किंवा फाजील महत्त्वकांक्षा ठेवली तर त्याचा अंत काय होतो हे टॉलस्टॉयने त्याच्या कथेत सांगितलं. त्याच्या कथेतील म्हाताऱ्याला संपत्ती आणि जमिनीचा हव्यास लागला. जमीन मिळवण्याची एवढी भूक लागली. त्यामुळे तो दिवसभर जमिनीसाठी धावत राहिला. तो प्रचंड धावला’.
‘सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जेवढा चालशील तेवढी त्याची जमीन. पण तो चालला नाही. तो धावला. त्याला जास्त जमीन हवी होती. तो दुपारी जेवला नाही. पाणी प्यायला नाही. पण तो धावतच राहिला. शेवटी तो पडला. आजारी पडला. त्याला ज्युपीटर हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करावं लागलं. तरी तो धावत राहिला. तो वेशीवर येऊन पडला. शेवटी त्याला काहीच मिळालं नाही. दो गज जमीन त्याच्या नशिबीसाठी आली. हे सर्व राजकारण्यांसाठी आहे. फडणवीस, शिंदे, मोदी आणि शहा सर्वांसाठी आहे. माणसाने कुठं थांबायचं हे ज्याला कळत नाही. त्याचा अंत फार वाईट होतो. हा जगातला नव्हे तर रामायण असेल, महाभारत असेल, बायबल असेल कुराण असेल कोणत्याही धर्मातील हे तत्त्व आहे. तुम्हाला कुठे थांबलं पाहिजे हे कळत नाही तोपर्यंत तुम्ही समाधानी होत नाही. तोपर्यंत समाधान होत नाही. हे त्यातील एक तत्त्व आहे, असे म्हणत संजय राऊतांनी अप्रत्यक्षरित्या फोडाफोडीच्या राजकारणावर भाष्य केलं.
आणखी एका आमदाराला ऑफर
‘तुम्ही आमदार आणि खासदार फोडत आहात. कार्यकर्ते फोडत आहेत. पैसे देत आहात. लिंगाडे नावाच्या आमदाराला २० कोटी ऑफर दिली. माहिती आहे. किती पाहिजे तुम्हाला. त्यामुळे तुम्हाला मग हॉस्पिटलमध्ये जाऊन स्ट्रेसमुळे अॅडमिट व्हावं लागत आहे. हे करू नका. थांबा कुठे तरी. थांबलं पाहिजे. त्यामुळे ती टॉलस्टॉयची गोष्ट आहे. आजचे राजकारणी वाचत नाही.म्हणून ती वाचावी. तुमच्या माध्यमातून समजून घ्यावी. आणि पूर्ण विराम तयार करावा. नाहीतर अंत आपोआप होईल, असे म्हणत संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला.