‘पूर्वी लोकांना मारायचं असलं की शेंदूर घालायचे….’, ऑपरेशन सिंदूरवरून राऊतांचा मोदींना टोला

माझ्या नसानसांत आता रक्ताऐवजी सिंदूर वाहत आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं. यावर बोलताना संजय राऊत यांनी मोदींना जोरदार टोला लगावला आहे.

पूर्वी लोकांना मारायचं असलं की शेंदूर घालायचे...., ऑपरेशन सिंदूरवरून राऊतांचा मोदींना टोला
Image Credit source: Tv9
| Updated on: May 25, 2025 | 5:13 PM

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘माझ्या नसानसांत आता रक्ताऐवजी सिंदूर वाहत आहे,’ असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. ते आंबेगावमध्ये कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत? 

मोदींनी किती सिंदूर लावायचा तो लावावा, पूर्वी कोणाला मारायचे असेल तर त्याच्या जेवणात शेंदूर घातला जायचा, असं राऊत यांनी म्हटलं आहे. दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, राजकारणात काय उलथापालथ होईल ते सांगता येत नाही, त्यामुळे स्वबळावर लढण्याची तयारी ठेवली पाहिजे. ज्यांना पक्षांनी सर्वाधिक दिले ते सोडून गेले,  पण ज्यांना काहीच मिळाले नाही ते आज बाळासाहेब  ठाकरे यांच्या विचाराने एकत्र आहेत. आता लढाई सुरू करा आम्ही तयार आहोत, असं म्हणणारे कार्यकर्ते हेच शिवसेनेचं बळ आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आंबेगावमध्ये शरद पवारांना सोडून गेलेले त्यांच्याच बाजुला बसतात मुके घेतात. बाजूला बसतात एकमेकांकडे बघत सुद्धा नाहीत. पण आम्हाला सोडून गेलेले समोर कोन येत नाही, बाजुने कोन जात नाही, ऐवढंच काय मोदीही माझ्या जवळ येत नाहीत, असंही यावेळी संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

मशाल चिन्ह आणि आपली शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. मला तुरुंगात टाकले साडेतीन महिन्यांनी सुटलो, बाळासाहेब ठाकरेंची पुण्याई शिवसैनिकाला किती दिवस तुरुंगात ठेवायचे असं न्यायदेवतेला वाटलं असावं हीच ठाकरेंची पुण्याई आहे. तुम्ही विरोधात असाल तर  सत्तेच्या विरोधात लढलं पाहिजे,  सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी करायची नाही. शिवसेनेची ओळख ही आंदोलनामुळे आहे, अनेक प्रश्न हाती घेऊन त्यावर आंदोलन उभी करा लोक तुमच्यामागे येतील, संघटना नसती तर खेडमध्ये आमदार निवडून आला नसता, संघटनेत मोठी ताकद आहे. खेडनंतर आंबेगावमध्ये शिवसेनेचा आमदार करायचा आहे,  फक्त तुम्ही ताकद द्या, असं आवाहन यावेळी राऊत यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं.