मला पूर्ण रामरक्षा येते, फडणवीसांच्या त्या टीकेवर राऊतांचा पलटवार, म्हणाले रामरक्षा म्हणणारेच मंदिरातील…

Sanjay Raut : अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहाराचा मुद्दा सध्या देशभरात गाजतो आहे. राज्यातही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने हा मुद्दा लावून धरला आहे. या पक्षातर्फे राज्यभरात रामरक्षा आंदोलन केले जात आहे. या आंदोलनावर मात्र भाजपाचे नेते सडकून टीका करत आहेत. ज्यांना रामरक्षा नीट वाचताही येत नाही, ते अशा प्रकारचे आंदोलन करत आहेत, असे […]

मला पूर्ण रामरक्षा येते, फडणवीसांच्या त्या टीकेवर राऊतांचा पलटवार, म्हणाले रामरक्षा म्हणणारेच मंदिरातील...
sanjay raut and devendra fadnavis
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 14, 2026 | 8:26 PM

Sanjay Raut : अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहाराचा मुद्दा सध्या देशभरात गाजतो आहे. राज्यातही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने हा मुद्दा लावून धरला आहे. या पक्षातर्फे राज्यभरात रामरक्षा आंदोलन केले जात आहे. या आंदोलनावर मात्र भाजपाचे नेते सडकून टीका करत आहेत. ज्यांना रामरक्षा नीट वाचताही येत नाही, ते अशा प्रकारचे आंदोलन करत आहेत, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस यांनी ठाकरेंच्या आंदोलनाला हिणवले आहे. दुसरीकडे मला संपूर्ण रामरक्षा येते, असे सांगायलाही ते विसरले नाहीत. दरम्यान, फडणवीसांच्या याच टीकेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी खास शैलीत फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

इतर अनेक मंदिरात लुटमार सुरू झाली

येत्या 18 जुलै रोजी ठाकरे गटाकडून नागपुरात रामरक्षा आंदोलन केले जाणार आहे. त्या निमित्ताने संजय राऊत नागपूरच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी राम मंदिराताली कथित गैरव्यवहार आणि फडणवीस यांनी केलेल्या टीकेवर भाष्य केले. अयोध्येच्या राम मंदिरात आणि इतर अनेक मंदिरात लुटमार सुरू झाली आहे. मंदिरातल्या दानपेटी फोडू लागले आहेत. ही फार गंभीर गोष्ट आहे, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले. तसेच राम मंदिरातील चोरीबाबत बेळगावच्या बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दुःख व्यक्त केले. पण हे प्रकरण तेवढ्यावर थांबणार नाही, अजून मुख्य आरोपी बाहेर आहेत त्यांना वाचविण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप राऊत यांनी केला.

आंदोनलाला आम्ही सगळ्यांना आमंत्रित करणार आहोत

बद्रीनाथ, केदारनाथ मंदिरात गैर व्यवहार झालेला आहे. रामरक्षा आंदोलनातून आम्ही लोकांना जागे करत आहोत. ढोंगी हिंदुत्ववाद आता संपले पाहिजे. त्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत 18 तारखेला साडेचार वाजता नागपुरात हे आंदोलन होणार आहे. या आंदोनलाला आम्ही सगळ्यांना आमंत्रित करणार आहोत. हे काही एका पक्षाचे आंदोलन नाही. जरी आम्ही पुढाकार घेतला असला तरी संघालाही आमंत्रित करतो, अशी माहिती यावेळी राऊत यांनी दिली.

फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर

पुढे बोलताना आंदोलनाच्या दिवशी देवेंद्र फडणवीस घरी असतील तर आम्ही नक्कीच त्यांना आमंत्रित करू. रामरक्षा पाठांतर करणाऱ्यांनीच राम मंदिर लुटले आहे. यांना उत्तम रामरक्षा म्हणता येत होती तेच राम मंदिरातील चोर निघाले, असे प्रत्युत्तर त्यांनी फडणवीस यांच्या टीकेला दिले. दरम्यान, आता 18 जुलै रोजीच्या रामरक्षा आंदोलनात नेमके काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us