
शिवसेना शिंदे गटाकडून श्रीनगरमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं, या रक्तदान शिबिराला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला आहे, त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाला डिवचलं आहे. ते संगमनेरमध्ये बोलत होते.
नेमकं काय म्हणाले राऊत
रक्तदान शिबिरावरून संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गट आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. देशाच्या सैनिकाला गद्दाराचं रक्त देऊ नका, असं रक्त दिलं तर देशावर मोठी आफत येईल, असं यावेळी संजय राऊत यांनी म्हटलं आहे. श्रीनगर येथे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबीर झालं होतं, यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी शिवसेना शिंदे गटाला चांगलंच डिवचलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की बाळासाहेब थोरात यांनी तुम्हाला शाळा दिली, पाणी दिले, पण तुम्ही त्यांना विधानसभेत पाठवलं नाही, याची मनामध्ये खंत आहे. चांगली माणस आहेत त्यांना संधी मिळाली पाहिजे, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील सरकारने कोविड काळात मोठे काम केले, कर्जमाफी दिली, मात्र हे सरकार खोटेपण करून पाडण्यात आलं, असं यावेळी राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या युतीची चर्चा सुरू आहे, मुंबईमध्ये झालेल्या विजयी मेळाव्यात तब्बल वीस वर्षानंतर हे दोन्ही बंधू एकाच व्यासपिठावर आल्याचं पाहायला मिळालं. तसेच राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या होत्या, यावर बोलताना राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ठाकरे बंधू एकत्र आले आहेत, असं त्यांनी म्हटलं.
तसेच राज्यातील काही महापालिकांनी उद्या मासंहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, यावरून राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे, यावर देखील राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निर्णय घेतला असला तर निर्णय का घेतला? हे पटवून द्या असं राऊत यांनी म्हटलं आहे.