भाजपकडून सकाळचा भोंगा म्हणून टीका, राऊत पहिल्यांदाच बोलले, म्हणाले भाजपकडेही आहेत पण ते…
शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आज टीव्ही 9 मराठीच्या न्यूज रूमला भेट दिली. गणपती बाप्पचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आज टीव्ही 9 मराठीच्या न्यूज रूमला भेट दिली. गणपती बाप्पचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान भाजपसाठी तुम्ही सकाळचा भोंगा आहात, शिवसेनेसाठी तुम्ही एक तडफदार तोफ आहात, तर महाराष्ट्रासाठी तुम्ही आवाज आहात, असं यावेळी संजय राऊत यांना विचारण्यात आलं, यावर उत्तर देताना राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपमध्ये भोंगे नाहीत का? तर ते आहेत, फक्त ते चालत नाहीत मध्येच बिघडतात, असा जोरदार टोला यावेळी राऊत यांनी भाजपला लगावला आहे.
दरम्यान सध्या राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. पंचनामे करण्यासाठी वेळ लागत आहे, असाही प्रश्न यावेळी राऊत यांना विचारण्यात आला, यावर बोलताना देखील त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्राचं सरकार हे परावलंबी आहे. ते दिल्लीत जातील. दिल्लीतून केंद्रीय पथकं येतील. मग त्यांना अहवाल देतील. दिल्लीतून मदत येईल. महाराष्ट्राच्या तिजोरीत या लोकांनी खडखडाट करुन ठेवला आहे. शेतकऱ्यांना एकरी 50 हजार रुपये द्यावे अशी मागणी होत आहे. मुलांच्या शिक्षणाची फी माफ करावी, चारा छावण्या सुरु कराव्यात अशा मागण्या होत आहेत. अनेक गोष्टी होत असतात. हे सर्व करणारी यंत्रणा सरकारकडे आहे का?. आपतकालीन व्यवस्था करुन ठेवली आहे. गेल्या कित्येक वर्ष महाराष्ट्रात दुष्काळ पडतोय. कधी ओला दुष्काळ, कधी सुका दुष्काळ. ही व्यवस्था सरकारने आधीच करुन ठेवायला पाहिजे होती. एल निनो किंवा वातावरण बदल, पर्यावरण बदलाच्या घटना घडतात. हे सर्व होत राहणार. पण सरकार काय करतय? सरकार एकपाऊल पुढे सर्व बाबतीत म्हणते पण ते दिसत नाही. या सरकारकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी आस्थेने विचार करणारं नेतृत्व नाहीये असं यावेळी राऊत यांनी म्हटलं आहे.
शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नावासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला आहे. टीएमसी तृणमूल काँग्रेसचं नाव आणि चिन्ह गोठवण्यात आलं आहे, आणि दोन्ही गटाला वेगवेगळी नावं देण्यात आली. हे शिवसेनेच्या बाबतीमध्ये देखील होऊ शकलं असतं का? असंही यावेळी राऊत यांना विचारण्यात आलं. यावर उत्तर देताना ते म्हणाले की, तसं होण्याची गरजच नव्हती, तृणमूल काँग्रेस हा मुळ पक्ष ममता बॅनर्जी यांचाच आहे ना? हे कोणी आता एक गृहस्त उपटले आहेत. ते म्हणतात माझा पक्ष कधी आले ते? त्यांचा जन्म कधी झाला? पक्षाचं मूळ हे ममता बॅनर्जींकडे आहे, शिवसेनेचं मूळ हे ठाकरेंकडे आहे. तरीही निवडणूक आयोग कधी चिन्ह गोठवत आहे, कधी फूटीर गटाला चिन्ह देत आहे. ही हेराफेरी आणि गोलमाल आहे. त्यामुळे लोकशाहीच्या रक्षणासाठी निवडणूक आयोगाला धडा शिकवावा लागेल.