‘अपघात घडवून मारतील…’, पोलीस भरती घोटाळा उघड करणाऱ्या वैभव चव्हाण याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल, धक्कादायक दाव्यांनी सर्वत्र खळबळ
Beed Vaibhav Chavan Audio Clip: बोगस खेळाडू प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाण याच्या संशयास्पद मृत्यूनंतर त्याची एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Beed Vaibhav Chavan Audio Clip: बोगस खेळाडू प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाण याच्या संशयास्पद मृत्यूनंतर त्याची एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या क्लिपमुळे खळबळ उडाली आहे. या कथित क्लिपमुळे वैभवचा घातपात (हत्या) झाल्याच्या नातेवाईकांच्या आरोपांना बळ मिळाले आहे. पोलीस याचा सखोल तपास करत आहेत. आमदार रोहित पवार आणि आमदार संदीप क्षीरसागरांच्या कार्यकर्त्यांना काही पुरावे दिल्याचा उल्लेख त्याने केला आहे. अपघात घडवून मारतील अशी भीती त्याने या ऑडिओतून भी व्यक्त केली आहे. TV9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.
ऑडिओ क्लीप मध्ये काय?
घोटाळा उघड केल्यामुळे आपल्याला सातत्याने धमक्या येत असून जीवाला मोठा धोका असल्याचा उल्लेख वैभवने बोलताना केला आहे. “माझा मृत्यू कशाही पद्धतीने झाला, तरी त्याला ‘कुराश संघटना’ आणि संबंधित लोकच जबाबदार असतील,” असा गंभीर दावा त्याने केला आहे. तक्रार मागे घेण्यासाठी मोठ्या लोकांकडून दबाव टाकला जात असल्याचे त्याने या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटले आहे.
वैभवने काय केली होती तक्रार?
वैभव चव्हाण हा उत्कृष्ट कराटेपटू होता. त्याच्याकडे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील प्रमाणपत्र होते. धाराशिव पोलीस भरतीत 2024-25 साठी त्याने खेळाडू कोट्यातून अर्ज दाखल केला होता. प्रतिक्षा यादीत असताना नागनाथ साबळे नावाच्या एका उमेदवाराविरोधात त्याने पुण्यातील बालेवाडी येथील क्रीडा आयुक्तालयात तक्रार दाखल केली होती. बोगस प्रमाणपत्राआधारे साबळे नोकरीला लागल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला होता. या तक्रारीनंतर बोगस खेळाडू प्रमाणपत्राचे रॅकेटच समोर आले. कुराश असोसिएशनच्या अध्यक्ष, सचिवांसह काही जिल्हाधक्ष्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तेव्हापासून वैभव आणि त्याच्या मित्राच्या जीविताला धोका असल्याचे तो सांगत होता. आता याविषयीची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
नातेवाईक म्हणतात हा घातपात
मृत वैभव याच्या अंगावर मारहाणीच्या स्पष्ट जखमा आढळून आल्याने त्याच्या नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून पूर्वनियोजीत खून असल्याचा आरोप केला आहे. यामागे एक व्यक्ती नसून मोठ्या रॅकेटचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. नातेवाईक आणि ग्रामस्थांनी या घटनेची सखोल आणि निष्पक्ष चौकशीची मागणी बीड ग्रामीण पोलिसांकडे केली आहे. याप्रकरणावरून वातावरण तापले आहे.
