
आज देशात उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडतंय. एनडीएचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे पी. सुदर्शन रेड्डी यांच्यातील ही लढत आहे. 10 वाजता सुरू झालेली मतदान प्रक्रिया संध्याकाळी 5 वाजता संपेल. 391 मतांची आवश्यकता आहे. एनडीएकडे 422 आणि इंडिया आघाडीकडे 312 खासदारांचे समर्थन आहे. मात्र, काहींनी या निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतलीये. आता या निवडणुकीबद्दल संजय राऊत यांना मोठा खुलासा केलाय. यासोबतच त्यांनी गंभीर आरोपही केले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मतदान करण्यासाठी संसदेत पोहोचले आणि त्यांनी आपला हक्क बजावला.
संजय राऊत यांनी म्हटले की, भाजपाला प्रत्येक निवडणुकीत पैशांच्या वापराची मोठी चटक लागलीये. BJD, BRS वर एनडीएला मतदान करण्यासाठी दबाब आहे. आमची मते पक्की आहेत आणि ही लढत रंगतदार होणार. हे तिन्ही दल तटस्थ राहिले म्हणजे हाच भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का आहे. जे सातत्याने भाजपाच्या बाजूने उभा राहिले प्रत्येक विधायकाच्यावेळी आज ते उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये मतदानासाठी येणार नाहीत, हा भाजपाला आणि मोदी, शहांच्या राजकारणाला धक्का आहे.
भविष्यामध्ये काय होऊ शकते, याचा हा अंदाज आहे. आमच्या उमेदवाराला मतच पडणार नाही, हे म्हणत असतील पण आज रात्री नऊपर्यंत दुध का दुध पाणी का पाणी होईलच. या क्षणी त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये 40 मतांची तफावत आहे, हे आम्ही मान्य करतो. त्यांच्याकडे मित्रपक्षाचे मिळून बहुमत आहे. तरीही आम्ही आमचे सुदर्शन रेड्डी यांना निवडणुकीत उतरवले आहे. पाहू काय होतंय.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, ज्यांचा स्वत:चा पक्ष भाजपात विलीन होण्यास निघालाय, ते भाष्य करत असल्याचे म्हणत शिंदेंच्या शिवसेनेवर राऊतांनी टीका केली. जे आज शिवसेनेत आहेत ते निष्ठावंत आमदार खासदार आहेत. ज्यांना जायचे होते तो गाळ निघून गेला. जे पैशाला विकत गेले, दहशतीला किंवा सीबीआय आणि ईडीला घाबरून निघून गेले, त्यांनी आमच्या पक्षातील निष्ठावंतांवर बोलणे हा शिवसेनेचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा अवमान आहे.