
महाराष्ट्रात सध्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारी करत आहेत. एकीकडे विविध पक्ष युती-आघाडी करत असताना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात मोठी दुफळी निर्माण झाली आहे. येत्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शरद पवार गट हे ठाकरे बंधूंसोबत लढणार की नाही, याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. आता यावर खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.
संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत संजय राऊतांना शरद पवार गटासोबत युतीची घोषणा कधी होणार, याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावरुन त्यांनी भाष्य केले. तसेच यावेळी संजय राऊतांनी वंचित आणि काँग्रेसच्या युतीचेही स्वागत केले. वंचित आणि काँग्रेसच्या युतीचे आम्ही स्वागत करतो. ते आमच्यासोबत नसतील आले तरी जर ते भाजपला रोखण्यास त्यांचा पराभव करण्यास हातभार लावणार असतील तर नक्कीच आम्ही नतद्रष्ट नाही, असे संजय राऊत म्हणाले.
जेव्हा दोन पेक्षा जास्त पक्ष एकत्र येतात आणि जागांची देवाण घेवाण होते त्यात ज्यांच्या जागा जातात अशा जागांमधील जे कोणी प्रमुख लोक असतात जे इच्छुक होणार ते अस्वस्थ होणारच, भाजपमधील, शिंदे गटात असतील. अजित पवार यासाठीच स्वतंत्र लढत आहेत. पण कार्यकर्त्यांना समजून सांगतील तर ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे ऐकतील. पण ज्या कोणाला असं वाटतं की माझ्यावर अन्याय झाला तो राग व्यक्त करतो. त्याला राग व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे. असं कुठे झालं, असं तर मला काही वाटत नाही, असे संजय राऊतांनी म्हटले.
तुमचे जे कोणी सूत्र हे सांगत असतील तर आम्ही त्या सूत्रांशी चर्चा करु. संपूर्ण महाराष्ट्रात मुंबईत लोक रस्त्यावर आलेले नाही. ठाण्यात राजीनामा सत्र सुरु आहे. तसं अजून कुठेही दिसत नाही. आम्ही कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन प्रत्येक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. हे १८५७ चे बंड आहे का, देशासाठी क्रांतीसाठी केलेले हे बंड नाही. हा प्रत्येकाचा व्यक्तिगत निर्णय असतो. ज्या पक्षाने आपल्याला ४० वर्ष जे काही दिलं एखाद्या वेळी तो पक्ष काहीच देऊ शकत नाही. अशावेळेला कोणाला मी बंड करतो असं म्हणत असेल तर मी त्याला बंड म्हणणार नाही. शिंदे गट म्हणतं आम्ही बंड केलं. कसलं बंड केलं. तिथे जाऊन ते बूटच चाटत आहेत. बंडाची व्याख्या समजून घ्या. एखादा जो कोणी वेगळं निर्णय घेतो त्याला बंड म्हणत नाही, असेही संजय राऊतांनी म्हटले.
राष्ट्रवादी आमच्यासोबत आहे याची घोषणा करण्याची गरज नाही. ते घोषित कशाला करायला हवं. आम्ही त्यांच्यासाठी जागा सोडलेल्या आहेत. घोषित करण्याचा आग्रह का हा प्रश्न तुम्ही राष्ट्रवादीला विचारायला हवा. आमच्याकडून त्यांना ज्या जागा सोडायला हव्या होत्या, त्यातल्या बहुसंख्य जागा आम्ही सोडलेल्या आहेत. म्हणजे युती झालेली आहे. त्यांना पाहिजे असलेल्या काही जागा मनसेच्या कोट्यात गेल्या, आम्ही त्यांना राज ठाकरेंशी चर्चा करा, असे सांगितले आहे. आमच्याकडून आम्ही हा विषय संपवला आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले.