भारताच्या सैन्यात मुस्लिम, तसंच संरक्षण दलात डॉ. प्रदीप कुरुलकर सुद्धा.. राऊतांच नितेश राणेंना उत्तर

"भारताच्या सैन्यात मुस्लिम सैनिक आहेत, पोलीस दलात मुस्लिम पोलीस आहेत. त्याचवेळी भारताच्या संरक्षण दलात डॉ. प्रदीप कुरुलकर सुद्धा आहेत. काश्मीरमध्ये जास्तीत जास्त शहीद होणारे मुस्लिम पोलीस आहेत. युद्धात मुस्लिम सैनिकांनी सुद्धा प्राणाच बलिदान देऊन या देशाच रक्षण केलं आहे हा इतिहास, वर्तमान तुम्हाला बदलता येणार नाही" असं संजय राऊत म्हणाले.

भारताच्या सैन्यात मुस्लिम, तसंच संरक्षण दलात डॉ. प्रदीप कुरुलकर सुद्धा.. राऊतांच नितेश राणेंना उत्तर
Sanjay Raut
| Updated on: Mar 12, 2025 | 12:03 PM

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात कोणीच मुस्लिम नव्हतं असा दावा नितेश राणे यांनी केला. त्यावर आता खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. “आता काय हसावं की काय, मला कळत नाही की, या राज्याच्या मंत्रिमंडळात काय काय नग भरलेले आहेत. माझी वाचाच गेली. छत्रपती शिवाजी महाराज हे सहिष्णू, संयमी, शूर असे योद्धे, सेनापती आणि राजे होते. कोणताही राजा जगाच्या पाठिवर एक धर्मीय राजकारण करु शकत नाही. औरंगजेबाच्या दरबारात सुद्धा हिंदू राजे होते. तसेच छत्रपतींच्या सैन्यात आणि त्यांच्या सभोवती अनेक मुस्लिम सरदार, योद्धे होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख कोण होता? किंवा शिवाजी महाराजांचे अंगरक्षक कोण होते? मी नाव घेत नाही, बखरी चाळाव्यात, समजून घ्यावा इतिहास मग इतिहासावर बोलाव” असं संजय राऊत म्हणाले.

“इतिहास बदलण्याची ही जी काही प्रक्रिया सुरु आहे, ती अत्यंत गंभीर आणि घातक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्यासाठी पहिली लढाई औरंगजेबाबरोबर केली नाही, ती चंद्रराव मोरेबरोबर केली हा इतिहास आहे. या चंद्रराव मोऱ्यांचे काही वंशज जर मंत्रिमंडळात असतील तर माननीय देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सर्व मंत्र्यांना इतिहासाचे धडे हे योग्य इतिहास तज्ञाकडून द्यावेत” असं संजय राऊत म्हणाले.

‘हा देश पन्हा फाळणीकडे ढकलायचा आहे’

“छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यासोबत सर्वधर्मीय लोक होते, म्हणून ते राज्य निर्माण करु शकले. छत्रपती शिवाजी महाराजांचा शत्रू फक्त औरंगजेब नव्हता, ते आदिलशाही, निजामशाही बरोबर सुद्धा लढले. ते सगळ्यांशी लढले आणि त्यांनी स्वराज्य स्थापन केलं. पण जे शाळेत गेले नाही, ज्यांचा वाचन संस्कृतीशी संबंध आला नाही. ज्यांना इतिहास ज्ञात नाही, ज्यांना फक्त मटणाची दुकान दिसतात, ज्यांना या देशामध्ये पुन्हा एकदा दंगली घडवायच्या आहेत. ज्यांना हा देश पन्हा फाळणीकडे ढकलायचा आहे, त्यांची अशी वक्तव्य आहेत” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

‘फाळणीची बीज रोवण्याच काम मोदींची पिल्लावळ करतय’

“मी पीएम मोदींनी पत्र लिहिणार आहे, या लोकांना आवरा, नाहीतर तुमच्यावर दुसऱ्या फाळणीचा ठपका येईल. जसं, तुम्ही पहिल्या फाळणीचा ठपका पंडित नेहरु आणि काँग्रेसवर ठेवता, तो एक वेगळा स्वातंत्र्याचा काळ होता. आता सर्वकाही नीट चाललेलं असताना, या देशात पुन्हा फाळणीची बीज रोवण्याच काम मोदींची पिल्लावळ करतय. इतिहासात नरेंद्र मोदींवर तो ठपका येईल” असं संजय राऊत म्हणाले.

‘मोदींना या देशाचा अफगाणिस्तान करायचा आहे का?’

नितेश राणेंनी मल्हार मटण, झटका मटण म्हटलं, त्यावर जेजुरी ट्रस्टने आक्षेप घेतला, त्यावर संजय राऊत म्हणाले की, “मूळात धनगर समाजात बकरी, मेंढी यांना देवाच स्थान आहे. ते स्वतहून त्यांना कापायला जात नाही, ते मुलासारख जपतात. बकरीच दूध हे हिंदुत्ववादी आहे” “कोणाची इच्छा असेल तर त्यांनी गायीच शेण खावं किंवा गोमूत्र प्यावं हा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या हिंदुत्वाचा प्रश्न आहे. वीर सावरकरांच्या हिंदुत्वात हे बसत नाही. त्यांचं हिंदुत्व हे विज्ञानवादी, आधुनिक विचारसरणीच हिंदुत्व होतं. पुन्हा कोणाला शेणात लोळायच असेल, तर आम्ही काय करणार?” असं संजय राऊत म्हणाले. “मोदींना या देशाचा अफगाणिस्तान करायचा आहे की हिंदू पाकिस्तान? हे त्यांनी ठरवून या देशाला दिशा दिली पाहिजे” असं संजय राऊत म्हणाले.