
राज्याच्या २९ महापालिकांची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकांचा निकालही जाहीर झाला असून यात महायुतीला बऱ्याच ठिकाणी घवघवीत यश मिळाले आहे. मुंबई महापालिकेत तब्बल ८९ जागा जिंकत भाजप हा मोठा पक्ष ठरला. तर शिवसेना शिंदे गटाला २९ जागा जिंकता आल्या. यानंतर आता सध्या राज्याच्या राजकारणात नगरसेवकांच्या फोडाफोडीवरून जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. आमचे नगरसेवक सुरक्षितपणे आपापल्या घरी आहेत, पण शिंदेंनी स्वतःच्या आणि भाजपच्या नगरसेवकांना कैदखान्यात का डांबले आहे? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.
संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे आता भाजपचेच नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. हे चित्र मुंबई आणि कल्याण-डोंबिवली (KDMC) या दोन्ही ठिकाणी पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे हे आता भाजपचे लोहपुरुष झाले आहेत. त्यांनी आधी शिवसेना फोडली, आता ते भाजपलाच सुरुंग लावत आहेत. अमित शाह त्यांना दिल्लीत खांद्यावर घेऊन फिरतात, त्यामुळे ते आता काहीही करू शकतात, असा टोला राऊत यांनी लगावला.
एकनाथ शिंदे यांनी महापौर पदावर दावा सांगितल्यावरूनही संजय राऊतांनी शंका उपस्थित केली. एकनाथ शिंदे यांना दिल्लीतून कोणीतरी चावी देत आहे. त्यांच्याच पाठबळावर हे सर्व सुरु असल्याचे संकेत संजय राऊतांनी दिले. आमचे नगरसेवक हे आपआपल्या घरी आहे. त्यांची बैठक मातोश्रीवर होते. ते आपपल्या गाडीने येतात आणि निघून जातात. तुमच्या नगरसेवकांना डांबून का ठेवलं गेलं, याचं उत्तर त्यांनी द्यायला हवं. मुंबईतील नगरसेवक, कल्याण डोंबिवलीतील कैदखान्यात डांबून का ठेवावे लागले, आमचे नगरसेवक आपपल्या घरी आहेत. ते रिचेबल की नॉट रिचेबल हा प्रश्न पुढचा आहे, असे संजय राऊतांनी म्हटले.
एकनाथ शिंदे भाजपचा नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. हे केडीएमसी आणि मुंबईत दोन्ही ठिकाणी होत आहे. एकनाथ शिंदे हे भाजपचे लोहपुरुष आहे. त्यांनी शिवसेना फोडली. त्यांना अमित शाह हे दिल्लीत खांद्यावर घेऊन फिरतात. आता ते काहीही करु शकतात. जर तसं नसतं तर त्यांनी महापौर पदावर दावा सांगितला असता का, कोणीतरी त्यांना दिल्लीतून चावी देत आहेत, दिल्लीतून एकनाथ शिंदेंना चावी देणारे कोण? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.
आम्ही जेवायला जातो की ते कुठे जेवायला जातात, ते बघूया. काँग्रेसचे नगरसेवक फुटणार नाही. त्यामुळे आता फोडाफोडीचा खेळ शिंदे-भाजप यांच्यातच होणार. या दोन गटातच फोडाफोडी होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अजून मज्जा येणार आहे, असे भाकीत राऊत यांनी वर्तवले आहे.