
गेल्या 2-3 दिवसांपासून झालेल्या पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलं, भरलं. या मुद्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार यांनी सरकारला लक्ष्य केलं, त्यानंतर आरोप प्रत्यारोपाचा खेळ सुरूच झाला आहे. आदित्या ठाकरेंच्या टीकेला काल आधी नारायण राणे मग नितेश राणेंनीही चोख प्रत्युत्तर देत त्यांच्यावर टीका केली. नारायण राणेंनी तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनाही सोडलं नाही. संजय राऊतांच्या नादाला लागू नका,ते भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये गेले होते असे म्हणत त्यांनी राऊतांवर टीकास्त्र सोडलं. मात्र त्यांच्या या विधानानंतर संजय राऊत चांगलेच बडकले असून त्यांनीही नारायण राणेंवर थेट निशाणासाला. राणेंनी आपल्या वयाचं भान ठेवावं. आपलं वय झालं. आपल्या टोपाचे केसही पिकलेत. याचं त्यांनी भान ठेवावं, असं म्हणत राऊतांनी राणेंवर सडकून टीका केली.
पाकिस्तानात तुम्हाला पाठवायचं की मोदींना ?
आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊतांनी चौफेर फटकेबाजी केली. त्यांनी नारायण राणेंवर तर टीका केलीच पण पंतप्रधान मोदीही त्यांच्या निशाण्यावर होते. संजय राऊतांच्या नादाला लागू नका, ते काय महात्मा आहेत का? असं काल राणे म्हणाले होते. त्यावर राऊतांनी चोख प्रत्युत्तर दिलं.
‘ पाकिस्तानात कुणाला पाठवायचं हे भविष्यात ठरवू. मोदींनी पाकिस्तानविरोधात मोदींनी दंड भरले होते ते पिचके आहेत का ?. प्रेसिडंट ट्रम्पने दम भरताच पाकिस्तानात जाणाऱ्या सैन्याला माघारी का बोलावलं हे राणेंनी स्पष्ट करावं, असं आव्हान राऊतांनी दिलं. ऑपरेशन सिंदूर चालवलं. पाक व्याप्त काश्मीर ताब्यात घेणार अशी गर्जना मोदी आणि भाजपने केली त्याचं काय झालं ? याचं उत्तर राणेंनी द्यावं. पाकिस्तानात तुम्हाला पाठवायचं की मोदींना ?. आम्ही नाही गेलो पाकिस्तानात, पण मोदीच नवाज शरीफचा केक कापायला पाकिस्तानात गेले होते. हे बहुतेक राणे विसरलेले दिसत आहेत असा टोला त्यांनी लगावला. नवाज शरीफचा केक कापायला कोण गेलं तर मोदी गेले मिस्टर राणे. आम्ही नाही गेलो. राणेंनी आपल्या वयाचं भान ठेवावं. आपलं वय झालं. आपल्या टोपाचे केसही पिकलेत. याचं त्यांनी भान ठेवावं. आणि प्रगल्भ वक्तव्य करावं’ अशा शब्दांत त्यांनी राणेंना खोचक टोला हाणला.
तुम्ही भाजपचे आश्रित
राणे हे भारतीय जनता पक्षाचे आश्रित असल्याची टीकाही राऊतांनी केली. ” तुम्ही कोण आहात? तुम्ही तर भाजपचे आश्रित आहात. तुम्ही स्वत:चा पक्ष काढून दंडावरच्या बेंडकुळ्या दाखवल्या असत्या तर आम्ही तुम्हाला मानलं असतं. राज ठाकरे यांचा स्वत:चा पक्ष आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे चोरलेला पक्ष आहे, पण तुम्ही भाजपचे आश्रित आहात. उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वत:चे 20 आमदार आणि 9 खासदार आहेत. भाजपचे किती खासदार आहेत तो आकडा मोजा, असं राऊतांनी राणेंना सुनावलं. ‘फक्त स्वत:च्या पेट्रोल पंपाचे आकडे मोजू नका, हे सुद्धा आकडे मोजा. आणि जी लढाई निवडणुकीत झाली नाही त्यातला हा विजय आहे. पाकिस्तानमध्ये घुसलेल्या सैन्याचे ज्यांनी पाय खेचले. त्यांच्या शौर्याचे पोवाडे राणेंनी गाऊ नये ‘ असा चिमटाही राऊतांनी काढला.