तुलसी गबार्ड…मोदींची बहीण, हातात गंगाजल ती खोटं बोलणार नाही, ईव्हीएममुळेच पराभव, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

नाशिकमधील शिवसेना ठाकरे गटाच्या पराभवांनंतर संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेच्या गुप्तचर संचालक तुलसी गॅबार्ड यांच्या भेटीवर टीका केली. गॅबार्ड यांनी ईव्हीएमद्वारे निकाल बदलल्या जाण्याच्या आरोपाचा उल्लेख करून, राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.

तुलसी गबार्ड...मोदींची बहीण, हातात गंगाजल ती खोटं बोलणार नाही, ईव्हीएममुळेच पराभव, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
sanjay raut pm narendra modi
| Updated on: Apr 16, 2025 | 7:26 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गॅबार्ड यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रयागराजच्या महाकुंभातून आणलेले गंगाजल त्यांना भेट म्हणून दिले. याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले. अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गॅबार्ड यांनी ईव्हीएमद्वारे निकाल बदलले जाऊ शकतात, असे म्हटले होते. आता यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी निशाणा साधला. ते नाशिकमध्ये बोलत होते.

नाशिकमध्ये आज शिवसेना ठाकरे गटाचे निर्धार शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची बहीण आणि अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गॅबार्ड यांच्या भेटीबद्दल भाष्य केले. अशा पराभवाने आम्ही खचून जाणार नाही. या पेक्षा वाईट काळ आपण पाहिला आहे. स्वत: शिवसेना प्रमुखांनी अनुभवला आहे. सगळ्या खराब काळाची जी व्यक्ती साक्षी असते ती उज्जवल भवितव्याची निर्माते असते, असे संजय राऊत म्हणाले.

आजचा मुहूर्त काढला

“मार्ग दाखवणारे उद्धव ठाकरे तुम्हीच आहात. उद्धव ठाकरेंना एवढंच सांगतो, हे संपूर्ण शिबीर नाशिकच्या शिवसैनिकांच्या मेहनतीने पार पडलं आहे. सर्व पदाधिकाऱ्यांनी तनमन आणि धन अर्पूण हे शिबीर यशस्वी केलं. ही ताकद आहे. आज आपल्याकडे सत्ता नाही. त्यामुळे असे कार्यक्रम कसे होऊ शकतात हा प्रश्न पडतो. पण शिवसैनिकांनी मनावर घेतले तर १०० कार्यक्रम घेतले जातात. आज आपलं शिबीर सुरू आहे. नाशिकमध्ये भाजपने दर्गे पाडण्याचं काम सुरू केलं आहे. का तर शहरात गोंधळ व्हावा, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण व्हावी आणि टीव्हीवर आपल्या बातम्या दिसू नये म्हणून आजचा मुहूर्त काढला. त्याला पुरून उरून आपला कार्यक्रम होत आहे. दिवसभर आपली बातमी होत आहे”, असे संजय राऊतांनी म्हटले.

पराभवाने आम्ही खचून जाणार नाही

“अनेकांना वाटलं पराभव झाला. शिवसैनिक खचला असेल. शिवसैनिक घरी बसला असेल. दहशतीखाली आहे असं अनेकांना वाटलं असेल. पण आजच्या शिबीराने दाखवून दिलं नाशिकचा शिवसैनिक खणखणीत आहे. अशा पराभवाने आम्ही खचून जाणार नाही. या पेक्षा वाईट काळ आपण पाहिला आहे. स्वत: शिवसेना प्रमुखांनी अनुभवला आहे. सगळ्या खराब काळाची जी व्यक्ती साक्षी असते ती उज्जवल भवितव्याची निर्माते असते”, असेही संजय राऊत म्हणाले.

संजय राऊतांनी म्हटला छावा चित्रपटातील डायलॉग

“छावा नावाचा सिनेमा आला. त्यात संभाजी महाराजांचा संघर्ष पाहिला. तो संघर्ष आपल्या वाट्याला आला. तेव्हा कवी भूषण होता. जेव्हा संभाजी महाराज निराश झाले. चारही बाजूने घेरले गेले. तेव्हा काय करावे हा प्रश्न पडला. तेव्हा कवीभूषणने एक मंत्र दिला. तो आपल्या शिवसेनेसाठीही महत्त्वाचा आहे.

कवीभूषण म्हणतो, मन के जीते जीत है, मन के हारे हार. हार गये जो बिना लडे उनपर है धिक्कार.
उनपर है धिक्कार जो देखे ना सपना
सपनों का अधिकार असल अधिकार है अपना
तू भोर का पहला तारा है, परिवर्तन का नारा है
यह अधिकार पल का है, फिर सबकुछ तुम्हारा है

आपल्याला याच मार्गाने जायचं आहे. संभाजी लढले. त्यांनी परिवर्तन केले. परिवर्तन करण्याची ताकद शिवसैनिकात आहे, असेही त्यांनी म्हटले.

“ती मोदींची बहीण, खोटं बोलणार नाही”

“नाशिकचा पराभव का झाला. आपण खूप विश्लेषण केलं. नाशिकच्या पराभवाचं विश्लेषण वॉशिंग्टनमध्ये झालं. तुळशी गबार्ड. नाव लक्षात ठेवा. ही साधी बाई नाही. मोदीची बहीण आहे. मोदी तिला सिस्टर तुलसी म्हणतात. मोदी आता अमेरिकेत गेलो होते. गंगाजल घेऊन गेले होते. तुलसी गबार्डला गंगाजल दिले. ही बाई साधी नाही. ही ट्रम्प सरकारमध्ये गुप्तचर विभागात आहे. तिने सांगितलं परवा. ईव्हीएम हायजॅक होतंय. ईव्हीएममुळे निकाल बदलले जाऊ शकतात. तुलसीने सांगितलंय. अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुखाने सांगितलं. मोदीच्या बहिणीने सांगितलं. तिच्या हातात गंगाजल आहे ती खोटं बोलणार नाही”, असा टोला संजय राऊतांनी लगावला.