विद्यानंद बापटांवर हल्ला का केला? हल्लेखोराने सांगितलं कारण, VIDEO
विद्यानंद बापट यांना मारहाण करणारा हल्लेखोर समोर आला आहे. त्याने गणेशोत्सव बंद झाल्यास अनेक घरातील चूल पेटणार नसल्याचा दावा हल्लेखोराने केला.

पुण्यात एका गणेश मंडळाच्या माजी अध्यक्षाने विद्यानंद बापट यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. सातत्याने डीजे बंदीची मागणी करणाऱ्या बापट यांच्यावर एका कार्यकर्त्याने हल्ला केला. संतोष चव्हाण नावाच्या व्यक्तीने बापट यांना मारहाण केली. मारहाण केल्यानंतर हा संतोष घटनास्थळावरून फरार झाला. परंतु पोलिसांनी शोध घेऊन संतोष चव्हाणचा यशस्वी शोध घेतला. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली आहे. अटकेआधीचा त्याचा एका व्हिडिओ समोर आला आहे. यात व्हिडिओमध्ये त्याने गणेशोत्सवावर बंधने आल्यास अनेकांच्या घरात चूल पेटणार नसल्याचा दावा केला.
हल्लेखोर संतोष चव्हाण याने एका व्हिडिओमध्ये म्हटले की, ‘गणेशोत्सवात डीजे आणि ढोल ताशामुळे नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे गणेशोत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा करण्याचा सल्ला दिला जात आहे. डीजे आणि ढोलताशा वाजवू नये, अशी मागणी केली जात आहे. ही मागणी प्रसारमाध्यमांवर दाखवली जात आहे. एक पुणेकर म्हणून पुण्याची खरी परिस्थिती सांगू इच्छित आहे. काही महत्त्वाची आकडेवारी समोर ठेवत आहे. पुण्यात एक खासदार, आठ आमदार, 165 नगरसेवक आहेत. वास्तव काय आहे? ठराविक नेते सोडले, तर कोणी नेते मंडळाच्या बाजूने ठामपणे बोलताना दिसत नाही. एखादा कोणी बोलले तर स्पष्ट भूमिका समजत नाही. मंडळाच्या बाजूने बोलताय की विरोधात बोलताय, हेच समजत नाही. पण एक गोस्ट कायम लक्षात ठेवा. निवडणूक आल्यावर हेच कार्यकर्ते दिवसाची रात्र करतात. तुमच्या सभांना गर्दी करतात’.
‘कार्यकर्ते प्रचारासाठी दिवसाची रात्र करतात. मंडळाच्या बैठक घेतात. रक्तदान शिबीराचं आयोजन करतात. वेगवेळे उपक्रम घेत असतात. कोरोनाच्या काळात प्रत्येक कार्यकर्त्याने दिवसाची रात्र केली आहे. ज्यांना कोरोना झाला, त्यांना रुग्णालयात नेण्याची गरज असूदे…प्रत्येक गोष्टी मंडळाच्या कार्यकर्त्याने केल्या आहेत. मंडळावर संकट येते, त्यावेळी एकही नेता येत नाही. आम्ही फक्त निवडणुकीसाठीच आहे का? कार्यकर्ता म्हणून वाईट वाटत आहे. गणेशोत्सव आल्यावर पर्यावरण प्रेमी जागे होतात. मग गणेशोत्सव आणि ढोलपथकाला विरोध करतात. गणेशोत्सव कसा साजरा करायचा, याचे ज्ञान द्यायला सुरुवात करतात. एक लक्षात असून द्या, असं चव्हाण म्हणाला.
‘पुणेकर सुज्ञ आहेत. गणेशोत्सव कसा साजरा करायचा, हे माहीत आहे. पुण्यात 3800 ते 4000 छोटे-मोठे मंडळ आहेत. नोंदणीकृत 1400 मंडळ आहेत. त्यांचा 12 दिवसांचा खर्च हा 100 कोटींहून अधिक असतो. हा पैसा पुण्यात राहील. घरगुती गणेशोत्सव पाहिले तर तीच उलाढाल 1000 कोटींची होते. विद्यानंद बापट साहेब, तुम्हाला सांगू इच्छित आहे की, साऊंडमुळे अडचणी होतात, पण आवाजाची मर्यादा असेल, ती पाळली गेली तर काही प्रोब्लेम होणार नाही. पुण्यात 1400 मंडळळापैकी 700 मंडळ हे साऊंड लावतात. त्यात तुम्ही साऊंड बंद करण्यास सांगतात. खरंतर तुम्ही साऊंड बंद करण्यास सांगत नाही, तर 8000 घरांची चूल बंद करण्यास सांगत आहात. तिथे लाइटवाले आले, ट्रॅक्टर-ट्रॉली वाले आले, डेकोरेशन वाले आले. त्यांना रोजगार कोण देणार, असा सवाल त्याने उपस्थित केला.