
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे क्रूर फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली. संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानतंर राजकारणात अनेक मोठमोठ्या घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. धनंजय मुंडे यांनी वैद्यकीय कारणास्तव मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचे ट्वीट करत सांगितले. याप्रकरणी आता भाजप आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर पुढचा प्लॅन काय याबद्दलही भाष्य केले.
धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर टीव्ही 9 मराठीने सुरेश धस यांच्याशी संवाद साधला. यावेळी सुरेश धस यांना धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासह संतोष देशमुखांच्या हत्येच्या क्रूर फोटोबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी भाष्य केले. आता या प्रकरणात कुणाचाही दबाव येणार नाही. पुरवणी आरोपत्रात काही सहआरोपी येतील, असे सुरेश धस म्हणाले.
“अजित दादा म्हणतात त्याला आम्ही कसं क्रॉस करू. मी छोटा कार्यकर्ता आहे. त्यांनी राजीनामा दिला हे महत्त्वाचं आहे. आता या प्रकरणात कुणाचाही दबाव येणार नाही. पुरवणी आरोपत्रात काही सहआरोपी येतील. मी म्हणत नाही. सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल करण्याचा अधिकार एसआयटीकडे आहे. माझ्या आरोपाचं खंडन केलं नाही. सातपुडा बंगल्यावर १९ ऑक्टोबरला खंडणी फायनल होण्यासाठी बैठक झाली होती. हे मी काल बोलत होतो. आजही बोलतो यानंतर बोलत नाही. एसआयटीने चौकशी थांबली असं म्हटलं नाही. चौकशी सुरू आहे. बऱ्याच जणांचे कॉल तपासायचे आहेत. घटना घडल्यानंतर आणि आधी काही लोक आहेत. काही अधिकाऱ्यांची इन्व्हॉल्वमेंट आहेत. सुदर्शन घोलेला डेंजर बनवणारे काही लोक आहे. त्यांची चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे”, असे सुरेश धस यांनी सांगितले.
“मी सभागृहात १६ डिसेंबर रोजीच लक्षात आणून दिलं. पण बरेच लोक म्हणाले सुरेश धस तू अतिरंजित बोलतो. असं नसेल झालं. पण चार्जशीट दाखल झाल्यावर सर्व बाहेर आलं. राज्यात आगडोंब उसळला. त्या गावातील लोकांची मेंटॅलिटी कशी झाली ते पाहा. त्यामुळे राजीनामा होणं हे महत्त्वाचं आहे. पंकजा मुंडे काय म्हणाल्या मी पाहिल्याच्या नंतर मी नंतर बोलेल. काल परवा म्हणाल्या पुण्यात बीडचं विचारू नका. तुम्ही देर से आये दुरुस्त आहे म्हणताना खरं आहे की खोटं आहे पाहीन आणि प्रतिक्रिया देईन”, असेही सुरेश धस म्हणाले.
“मुंडेंचा राजीनामा एवढंच उत्तर नाही. सर्वांना फाशी झाली पाहिजे. राजीनामा किरकोळ बाब आहे. फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालवणं, या लोकांना संधी न मिळू देणं, १४५ साक्षीदार टिकून ठेवणं आणि अधिकारी टिकवून ठेवणं ही मोठी कसरत आहे. आम्ही, देशमुख कुटुंब आणि मस्साजोगचे ग्रामस्थ आम्ही या प्रकरणाला धसासाला लावू. महादेव मुंडे प्रकरण सहा महिने झाले. प्रकरणाचा तपास नाही. परळीच्या पोलिसांनी गुन्हे दाखल केले नाही. कोर्टाने दाखल केले आहे. आता परळीचे लोक सुटकेचा निश्वास ठेवतील. आकाच्या मागे मोठा आका नाही, त्यामुळे अनेक लोक आता फिर्याद द्यायला येतील”, असेही सुरेश धस यांनी म्हटले.
“हत्येनंतर १५ व्हिडीओ कॉल केले. एक नाही दोन नाही. १५ केले. कुणाकुणाला केले. आकाला केला का. विष्णू चाटे छोटा आका त्याला केला का. सुदर्शन घुले हा बाप म्हणा म्हणतो. वाल्मिक कराडने जिल्ह्याचा बाप असल्याचं म्हटलं. आता आमचा बाप आम्ही कुठे घालायचा. सुदर्शन घुले सापडेल. पळून पळून कुठे जातील. पोलीस त्याला १०० टक्के पकडतील. पोलीस चार्जशीटमध्ये होते. आता मोकळे झाले. सर्व पोलीस मागे लागले तर त्याला पकडतील”, असाही विश्वास सुरेश धस यांनी व्यक्त केला.
“ही लढाई संपणार नाही. राजीनामा झाला म्हणून राजीनामा संपेल असं नाही. राष्ट्रपतींकडे माफीनामा गेला तरी लढाई सुरूच राहील”, असेही सुरेश धस यांनी म्हटले.