मोठी बातमी! संतोष देशमुख हत्याप्रकरण, अखेर तो मोबाईल पोलिसांना सापडला

काही दिवसांपूर्वी कळंबमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता, संतोष देशमुख यांना अडकवण्यासाठी या महिलेचा वापर करण्यात येणार होता, असा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणात आता पोलिसांना मोठा पुरावा मिळाला आहे.

मोठी बातमी! संतोष देशमुख हत्याप्रकरण, अखेर तो मोबाईल पोलिसांना सापडला
santosh deshmukh
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 04, 2025 | 4:18 PM

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर राज्यात वातावरण चांगलंच तापलं. या प्रकरणात सुरुवातीपासूनच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी कळंब येथे एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता.  मनीषा बिडवे असं या मृत महिलेचं नाव आहे, संतोष देशमुख यांना अडकवण्यासाठी या महिलेचा वापर करण्यात येणार होता, असा आरोप दमानिया यांनी केला. दमानिया यांच्या आरोपानंतर चांगलीच खळबळ उडाली.

दरम्यान मनीषा बिडवे यांच्या हत्याप्रकरणात आता पोलिसांना मोठा पुरावा मिळाला आहे.    मनीषा बिडवे या महिलेचा मोबाईल पोलिसांनी  हास्तगत केला आहे. मनीषा बिडवे यांची हत्या करणारा आरोपी रामेश्वर उर्फ राण्या भोसले याच्या घरी हा मोबाईल सापडल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. सापडलेला मोबाईल डिस्चार्ज असून, या मोबाईलच्या माध्यमातून पुढील धागेदोरे पोलिसांच्या हाती येण्याची शक्यता आहे.

मनिषा बिडवे हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी केज येथील रहिवासी असून, तो संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याच्या गावात उसतोडणीच्या कामाला होता, अशी माहिती समोर येत आहे. तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले हा मुकादम होता. तर बिडवे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य साक्षीदार महादेव घुले हा देखील सुदर्शन घुले यांच्या गावचा रहिवासी आहे. या हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपी आपल्याकडे ऊस तोडणीच्या कामाला होते, अशी माहिती महादेव घुले यांनी दिली आहे. दरम्यान या सर्व प्रकरणात संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी देखील शंका उपस्थित केली आहे.

दरम्यान मनीषा बिडवे हत्या प्रकरणातील आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना नऊ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मनीषा बिडवे यांचा मोबाईल पोलिसांच्या हाती लागला आहे,  त्यामधून बिडवे यांची हत्या नेमकी कशामुळे झाली याची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.