
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा लढा अजूनही सुरूच आहे. धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असला तरी मस्साजोगच्या गावकऱ्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा लढा आणखी तीव्र केला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी तर या प्रकरणावर नवीन प्रकाश टाकला आहे. या प्रकरणाच्या बैठका कुठे झाल्या होत्या? कुणाच्या बंगल्यावर झाल्या होत्या? याची माहिती देतानाच कुणाला सहआरोपी करावं? यावरही मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य केलं आहे. मीडियाशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांनी ही मागणी केली आहे.
परळीतील धनंजय मुंडेंच्या कार्यालयावर कट ठरला, दुसरी बैठक मुंबई बंगल्यावर झाली. आता ही तिसरी आहे. धनंजय मुंडे यांचे चार महिन्यांचे सीडीआर तपासा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे यांना वाचवू नये. नाही तर उद्या हाच तुमच्यासमोर संकट बनून येईल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येला आज तीन महिने झाले आहेत. सरकार अजूनही भावनेशी खेळत आहे. कारण तीन महिने उलटूनही एक आरोपी अद्याप सापडत नाही. धनंजय मुंडे यांना या प्रकरणात सहआरोपी केले नाही. तसेच या प्रकरणाचा त्या दिशेने तपासही सुरू केलेला नाही. धनंजय मुंडे यांना सहआरोपी केलंच पाहिजे, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे.
वैभवी देशमुख हिच्या जबाबावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. धमक्या देणं हे यांचे कामच होतं. धनंजय मुंडे यांनी अश्या टोळ्याच केलेल्या आहेत. मुंडे यांच्या कार्यालयातच कटकारस्थान झालं. या प्रकरणात सरकारने दयामाया केली तर सरकारवर संकट येईल, असा इशाराच त्यांनी दिला आहे.
यावेळी त्यांनी पंकजा मुंडे यांच्याबाबतही प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली तर त्रास होणारं नाही. सर्व समाजाला घेऊन काम करा, स्वत:च्या जातीतील लोकं वाचवून दुसरे गुंतवायचे असं नसतं चालत. संतोष देशमुख यांना न्याय देतील असं आता आम्हाला वाटायला लागलंय. जातीवाद होऊ नये फक्त एवढेच म्हणणे आहे, असंही ते म्हणाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुंभमेळ्यातील स्नानावर टीका केली आहे. त्यावरही जरांगे यांनी भाष्य केलं. आम्ही कट्टर हिंदू आहोत. आमची मागणी समाजासाठी आहे. समाजाच्या नावावर आपल्याला फसवलं जातं, हिंदूंनी सावध राहणे गरजेचे, राज ठाकरे यांचं हिंदुत्व एकट्याच आहे. फक्त बोलण्याने हिंदुत्ववादी होता येत नसतं. करून दाखवावं लागतं. बेगडी हिंदुत्व नको. यांना देवापेक्षा जात मोठी वाटते, अशी टीका त्यांनी केली.