Saoji Mutton Recipe : तुकाराम मुंढेंच्या वक्तव्यामुळे चर्चेत आलेलं सावजी मटण बनतं तरी कसं? जाणून घ्या रेसिपी

Saoji Mutton Recipe : एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आलेलं सावजी मटण आहे तरी काय, ते कसं बनवलं जातं, याविषयी जाणून घ्या..

Saoji Mutton Recipe : तुकाराम मुंढेंच्या वक्तव्यामुळे चर्चेत आलेलं सावजी मटण बनतं तरी कसं? जाणून घ्या रेसिपी
तुकाराम मुंढेंच्या वक्तव्यानंतर सावजी मटण चर्चेत
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 06, 2026 | 3:44 PM

नागपुरातील लोकप्रिय खाद्यपदार्थ म्हटलं की ‘सावजी मटण’ हे नाव प्रत्येकाच्या तोंडी असतंच. नागपूर, विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात सावजी मटणाची लोकप्रियता आहे. सावजी ही विदर्भाची खाद्यसंस्कृती आणि समाजाची ओळख आहे, असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. मात्र याच सावजीबद्दल अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एका कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. “मी सावजी खाल्ला तर एक महिना आजारी पडेन”, असं ते म्हणाले होते. त्यांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं आणि सर्वत्र सावजीचीच चर्चा रंगली. हे सावजी मटण नेमकं काय आहे, ते कसं बनतं.. त्याबद्दल जाणून घेऊयात..

सावजी मटणाची खरी ओळख म्हणजे त्यातील मसाले आणि चव. ‘सावजी’ हा शब्द सावजी समाजाच्या पाककलेशी जोडला जातो. अतिशय तिखट, सुगंधी आणि गडद रंगाचा मसाला, ही याची खासियत. धणे, खोबरं, खसखस, काळी मिरी, दालचिनी, लवंत, दगडफूल, वेलची यांसारखे गरम मसाले भाजून हा मसाला तयार केला जातो. नागपूरचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी सावजी मटणाची रेसिपी दाखवली आहे.

सावजी मसाला कसा बनवतात?

बडीशेप, जिरे, धणे, मोठी वेलची, काळी मिरी, दालचिनी, चक्रीफूल, जावित्री, छोटी वेलची आणि तमालपत्र हे खडे मसाले कोरडेच भाजून घ्यायचे. त्यात थोडे तांदूळ आणि सुकी लाल मिर्ची घालून मसाला पुन्हा भाजून घ्यायचा. भाजलेले हे सर्व मसाले एकत्र करून मिक्सरमध्ये बारिक वाटून घ्यायचं. अशाप्रकारे सावजी मसाला तयार होतो.

सावजी मटण कसं बनवायचं?

सर्वांत आधी आलं-लसणाची पेस्ट, मीठ, हळद आणि कोथिंबीर हे सर्व लावून मटणाला मॅरिनेट करून घ्यावं. कुकरमध्ये किंवा भांड्यात मटण थोडं परतून घेऊन त्याला व्यवस्थित शिजवून घ्यावं. दुसरीकडे कढईत तेल गरम करून त्यात तमालपत्र आणि आलं-लसणाची पेस्ट परतून घ्यावी. यात जिरे पावडर, हळद, लाल तिखट आणि सावजी मसाला घालावा. मसाल्याला तेल सुटू लागल्यावर त्यात गरजेनुसार पाणी घालून उकळी येऊ द्यावी. आता शिजवलेलं मटण या ग्रेव्हीमध्ये टाकून उकळी येऊ द्यावी. अशा पद्धतीने सावजी मटण तयार झालं असून कोथिंबीर घालून ती सर्व्ह करावी.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us