सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी लावला कर; भाविकांना किती रुपयांचा बसणार भुर्दंड?

| Updated on: Feb 24, 2022 | 3:14 PM

सप्तश्रृंग गडावर दरवर्षी लाखो भाविक येतात. मात्र, त्यांना सुविधा पुरवताना ग्रामपंचायतीसमोर आर्थिक संकट असते. हे ध्यानात घेता उत्पन्नाची मर्यादा वाढवण्यासाठी भाविकांच्या वाहनांवर कर लावण्याची मागणी यापूर्वी करण्यात आली होती. त्यालाच आता मंजुरी देण्यात आलीय.

सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी लावला कर; भाविकांना किती रुपयांचा बसणार भुर्दंड?
सप्तश्रृंग गडावर देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक हजेरी लावतात.
Follow us on

नाशिकः महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सप्तश्रृंगी (Saptashrungi) देवीच्या दर्शनासाठी कर (Tax) लावण्यात आल्याचे समोर आले आहे. आता यापुढे देवीच्या दर्शनासाठी खासगी वाहनातून येणाऱ्या भाविकांना जास्त कर आकारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत पारित करण्यात आला आहे. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यासाठी विरोध होण्याची शक्यता गृहीत धरून हा  प्रस्ताव मागच्या दाराने घुसवण्यात आल्याचे समजते. विशेष म्हणजे हा ठराव कोणी मांडला आणि त्याला अनुमोदन कोण दिले, हे सुद्धा अजूनही गुलदस्त्यात आहे. मात्र, या निर्णयामुळे अनेक भाविकांमध्ये नाराजी आहे.

किती आणि का वाढवला कर?

सप्तश्रृंग गडावर दरवर्षी लाखो भाविक येतात. मात्र, त्यांना सुविधा पुरवताना ग्रामपंचायतीसमोर आर्थिक संकट असते. हे ध्यानात घेता उत्पन्नाची मर्यादा वाढवण्यासाठी भाविकांच्या वाहनांवर कर लावण्याची मागणी यापूर्वी करण्यात आली होती. तशी चर्चा जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत झाली. सप्तश्रृंग गड ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेकडे त्याबाबत पत्रव्यवहारही केला होता. हे सारे ध्यानात घेता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दरडोई पाच रुपये कर लावण्यासाठी मंजुरी दिल्याचे समजते.

कसा लावतील कर?

सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी एखाद्या वाहनातून पाच जण आले असतील, तर प्रत्येकाकडून पाच रुपये कर म्हणजे एकूण 25 रुपये वसूल केले जातील. प्रत्येक भाविकाला पावती द्यावी लागेल. मात्र, या दरडोई पाच रुपयांच्या कराबद्दल भाविकांमध्ये नाराजी आहे. सप्तश्रृंगी गड हे महाराष्ट्रातील मोठे दैवत. इथे लाखो लोक येतात. ते देवीला सढळ हस्ते दानही करतात. त्यानंतरही अव्वाच्यासव्वा कर आकारणी करण्यात आल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे या कर प्रस्तावाला विरोधाची शक्यता गृहीत धरून तो गुपचूपपणे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत घुसवण्यात आला आणि मंजूर करण्यात आल्याचे समजते. त्यावरून आत्ताच ठिणग्या पडायला सुरुवात झाली आहे. येणाऱ्या काळात हा विरोध वाढू शकतो.

इतर बातम्याः

Birth Anniversary | पोरकी लेक, प्रसिद्ध अभिनेत्री, 5 वेळा मुख्यमंत्री; जयललितांचा रोमहर्षक प्रवास…!

महापालिकेत घराणेशाहीचा झेंडा; नाशिकमध्ये नेत्यांच्या एका-एका घरातून तिघा-तिघांना हवे तिकीट!

नाशिकमध्ये 7 नगरपरिषदांच्या निवडणुका; प्रभाग रचना 5 एप्रिलला होणार प्रसिद्ध, कसा आहे कार्यक्रम?