सामान भरलं, कुटुंबियही बसले, नवीन घरात जाणार तेवढ्यात… साताऱ्यात भीषण दुर्घटना, 4 जण ठार
साताऱ्यातील कासरतळे येथे एक भीषण अपघात झाला असून घरातील सामान भरलेला आयशर ट्रक ५० फूट खोल दरीत कोसळला आहे. या हृदयद्रावक घटनेत एका लहान मुलासह तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी आहेत.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अपघाताचे सत्र पाहायला मिळत आहे. त्यातच आता साताऱ्यात एक भीषण अपघात घडला आहे. सातारा तालुक्यातील कासरतळे येथे शुक्रवारी रात्री एक हृदयद्रावक घटना घडली आहे. घरातील सामान भरून निघालेला एक आयशर ट्रक ५० फूट खोल दरीत कोसळल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात एका लहान मुलासह तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. सध्या जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, कासरतळे गावातील एका कुटुंबाचे पुनर्वसन झाल्यामुळे ते आपल्या घरातील सर्व साहित्य आयशर ट्रकमध्ये भरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्याच्या तयारीत होते. हे कुटुंबिय शुक्रवारी रात्री उशिरा रस्त्याच्या कडेला ट्रक उभा करून त्यात सामान भरत होते. मात्र, अचानक ट्रकचे नियंत्रण सुटले. त्यामुळे तो रस्त्याच्या कडेला असलेल्या ५० फूट खोल दरीत कोसळला. या भीषण अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यात ३ महिला आणि १ लहान मुलाचा समावेश आहे.
यावेळी ट्रकमध्ये असलेल्या अन्य दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर सातारा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या ट्रकमध्ये कुटुंबासोबत त्यांची काही पाळीव जनावरेदेखील होती. या अपघातात काही जनावरांचाही मृत्यू झाला आहे. सुदैवाने या अपघातात ट्रकचा चालक बचावला आहे.
चौघांचा मृत्यू
सितारामा आडागळे (रा कामठी परळी ता सातारा), कल्पना सागर आवळे (वय 35, रा कवठे, सुरूर वाई) गार्गी सागर आवळे (वय 6 ) लिलाबाई उत्तम अडागळे (वय 60 रा. कामठी परळी) अशी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ट्रेकर्स आणि बचाव पथकांनी धाव घेतली असून, रात्री उशिरापर्यंत दरीतून जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू होते
हा अपघात होताच मोठा आवाज झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी बचावकार्य सुरू केले. याबद्दलची माहिती मिळताच सातारा तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हा ट्रक नेमका कशामुळे कोसळला, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. रस्त्याच्या कडेला असलेली जमीन खचली की ट्रक चुकीच्या पद्धतीने उभा केला होता? असा सवाल उपस्थित होत आहे. सध्या पोलीस याचा तपास करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण कासरतळे परिसरावर शोककळा पसरली आहे.