सातारा डॉक्टर महिला प्रकरणात बीड केंद्रस्थानी, सर्वात मोठी शंका समोर!

साताऱ्यातील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणात रोज नवनवे खुलासे केले जात आहेत. आता बीड जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून एक मोठी मागणी समोर आली आहे.

सातारा डॉक्टर महिला प्रकरणात बीड केंद्रस्थानी, सर्वात मोठी शंका समोर!
satara doctor death case
| Updated on: Oct 27, 2025 | 6:40 PM

Satara Phaltan Dotor Death Case : सातारा डॉक्टर महिला प्रकरणात आता नवनवे आणि खळबळजनक खुलासे होत आहेत. या प्रकरणात आरोपी असलेला निलंबित पीएसआय गोपाळ बदने आणि डॉक्टर महिला यांच्यात तीन महिने व्हॉट्सअॅपवरून संभाषण होते, असा दावा केला जातोय. सोबतच डॉक्टर महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी शेवटचा कॉल पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर याला केला होता, असेही समोर आले आहे. दुसरीकडे राजकीय आणि पोलिंसाकडून टाकण्यात येत असलेल्या दबावाला कंटाळून या डॉक्टर महिलेने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. असे असतानाच आता या प्रकरणाच्या तपासाबाबत सर्वात मोठी मागणी करण्यात आली आहे.

नेमकी मागणी काय?

फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर महिलेने केलेल्या आत्महत्येचा खटला फलटणच्या किंवा साताऱ्याच्या कोर्टात न चालवता तो बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयात चालवावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बाबुराव पोटभरे यांनी केली आहे. फलटणमध्ये सरकारकडून, पोलिसांकडून, आरोपींकडून डॉक्टर महिलेच्या चारित्र्याचे हनन करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. तिच्या चारित्र्याचा आणि वागण्याचा कसलाही संबंध नसताना सरकारकडून, आरोपींकडून हा प्रयत्न सुरू आहे, असा गंभीर करत डॉक्टर महिलेची सुरू असलेली बदनामी तत्काळ थांबवा, अशी मागणी पोटभरे यांनी केली आहे. तसेच या खटला बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयात चालवावा. म्हणजे साक्षीदारावर कसलाही दबाव येणार नाही आणि त्यात फेरबदल होणार नाही, असेही पोटरभरे म्हणाले आहेत.

बीड केंद्रस्थानी का आले?

ज्या डॉक्टर महिलेने स्वत:चे जीवन संपले ती मूळची बीड जिल्ह्यातील आहे. कुटुंबाची परिस्थिती नाजूक असतानाही तिने आपले शिक्षण पूर्ण केले होते. या प्रकरणात आरोपी असलेला पीएसआय गोपाळ बदने हादेखील बीड जिल्ह्यातीलच रहिवासी आहे. याच कारणामुळे बीड जिल्ह्यातील नेते तथा आमदार धनंजय मुंडे यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी तसेच या प्रकरणाचा तत्काळ तपास करून दोषींना कठोर शासन करावे, अशी मागणीही त्यांनी केले आहे. असे असताना आता पोटभरे यांनी या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी बीडमध्ये व्हावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता न्यायालय तसेच सरकार नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.