म्हणूनच महिला डॉक्टरने आत्महत्या केली? फलटण प्रकरणाला धक्कादायक वळण; खळबळजनक माहिती समोर!
साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला आता नवे आणि मोठे वळण मिळाले आहे. या प्रकरणात नवा दावा करणारे एक दाम्पत्य समोर आले असून सगळीकडे खळबळ उडाली आहे.

Satara Phaltan Dotor Death Case : साताऱ्यातील फलटण येथील रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर खळबळ उडाली आहे. या महिला डॉक्टरवर नेमका कोणाचा दबाव होता, असा सवाल उपस्थित केला जात आहे. शवविच्छेदनाचा अहवाल बदलण्यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात येत होता. त्यामुळेच पोलीस आणि महिला डॉक्टरमध्ये वाद झाला होता, असे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात आरोपी असलेल्या निलंबित पीएसआय गोपाळ बदने आणि पोलीस अधिकारी प्रशांत बनकर यांच्या ती संपर्कात होती, असा दावा केला जातोय. दरम्यान, या सर्व चर्चा आणि दाव्यानंतर आता खळबळ उडवून देणारी नवी माहिती समोर आली आहे. फलटण येथील वाठार निंबाळकर गावातील कुटंबाने समोर येत धक्कादायक दावे केले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.
त्यावर आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचीच सही
मिळालेल्या माहितीनुसार साताऱ्यातील महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात सातारा जिल्ह्यातील वठार निंबाळकर गावातील एका कुटुंबाने अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांची घेतली भेट. फलटण येथील वाठार निंबाळकर येथील विवाहित मुलीने आत्महत्या केलेला शवविच्छेदनाचा अहवाल खोटा असल्याचा आरोप या दाम्पत्याने केला आहे. आमच्या मुलीच्या शवविच्छेदनाच्या अहवालावर सध्या आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचीच सही होती. त्यामुळे आमच्या मुलीच्या शवविच्छेदनाचा अहवाल तयार करताना महिला डॉक्टरवर कोणाचा दबाव होता, हे तपासलं पाहिजे, अशी मागणी या दाम्पत्याने केली आहे.
चुकीचा शवविच्छेदन अहवाल?
या दाम्पत्याच्या खळबळजनक दाव्यानंतर आता साताऱ्यातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणाचा एका विवाहितेच्या आत्महत्येशी संबंध असल्याचा संशय व्यक्त होत आहे. मयत विवाहितेच नाव दिपाली असे आहे.मयत दिपालीची आई भाग्यश्री पाचांगणे यांनी तिच्या मुलीच्या मृत्यू प्रकरणात चुकीचा शवविच्छेदन अहवाल तयार करण्यासाठी संबंधित महिला डॉक्टरवर दबाव टाकण्यात आला होता, असा दावा केला आहे. दीपाली यांचे 2021 साली अजिंक्य निंबाळकर या लष्करी अधिकाऱ्याशी लग्न झाले होते.
माझ्या मुलीच्या मृत्यूनंतर पाच दिवस पोलिसांनी…
विवाहानंतर सासरच्या मंडळींकडून दिपालीला मानसिक आणि शारिरीक छळाला सामोरं जावं लागलं, असा पाचांगणे दाम्पत्याचा आरोप आहे. अखेर 19 ऑगस्ट 2025 रोजी दिपालीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. मात्र, दिपालीच्या आई भाग्यश्री यांनी या आत्महत्येची सखोल चौकशी करण्याची मागणी अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांना निवेदनाद्वारे केली आहे. “माझ्या मुलीच्या मृत्यूनंतर पाच दिवस पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल दिला नव्हता. या अहवालावर सही करणाऱ्या महिला डॉक्टरनेच आता आत्महत्या केली आहे,” असं भाग्यश्री यांनी सांगितलं आहे.
आता पोलीस नेमकी काय भूमिका घेणार?
“माझ्या मुलीच्या प्रकरणात राजकीय दबाव आणि पोलिसांच्या संगनमताने सत्य दडपलं गेलं. डॉक्टरवर चुकीचा अहवाल तयार करण्यासाठी दबाव होता आणि त्यांनी आपल्या आत्महत्येच्या पत्रातही अशा प्रकारच्या दबावांचा उल्लेख केला आहे, असाही दावा पाचांगणे कुटुंबाने केला आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये पोलीस नेमकी कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
