
Satara Phaltan Doctor Death Case : सातारा फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. आत्महत्येच्या या घटनेत आता रोज नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना आता अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात भाजपाचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचेही नाव घेतले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र निंबाळकर यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असे सांगितले आहे. दरम्यान, आता याच प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते विजयसिंग बांगर यांनी मोठा आणि खळबळजनक दावा केला आहे. महिला डॉक्टरने आत्महत्या केलेली नसून त्यांची हत्या झालेली आहे, असे बांगर म्हणाल आहेत.
बांगर यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना हा आरोप केला आहे. महिला डॉक्टरने गरीब कुटुंबातून शिक्षण घेतलं. महिला डॉक्टर ही उच्चशिक्षित होती. ती प्रशासनाशी एकटी लढत होती. तक्रार करत होती. प्रश्न विचारत होती. ते लेकरू आत्महत्या करूच शकत नाही, असा दावा बांगर यांनी केला. तसेच तर ठाम मत आहे की ही आत्महत्या नसून हत्या आहे, असं खळबळजनक विधानही त्यांनी केलंय.
महाडिक, बदने या सर्व पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांची चौकशी व्हायला पाहिजे. यासह माजी खासदार निंबाळकर, निंबाळकर यांचे पीए यांचीदेखील चौकशी व्हायला पाहिजे. सर्वात अगोदर महिला डॉक्टरची आत्महत्या आहे की हत्या आहे हे शोधलं पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणात आरोपी असलेल्या निलंबित पीएसआय गोपाल बदने आणि पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर या दोघांनाही अटक करण्यात आले आहे. दोघांहीची कसून चौकसी केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमकं काय समोर येणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सोबतच पीएसआय बदने आणि बनकर नेमका काय दावा करणार? महिला डॉक्टरने आत्महत्या करण्यामागे नेमके काय कारण होते? हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.