Raju Shetti: स्वाभिमानीच्या ‘रास्ता रोको’ला 45 तास पूर्ण; तोडगा न निघाल्याने आंदोलन अधिक तीव्र होणार, मुंबईचा दाणापाणी थांबणार, राजू शेट्टींचा इशारा काय?
Swabhimani Shetkari Saghatana Sugarcane Protest: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गेल्या 45 तासांपासून पुणे-बेंगळुरू महामार्गावर ठिया आंदोलन सुरू आहे. सरकार दरबारी तोडगा काढण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असतानाच जर तोडगा निघाला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

Swabhimani Shetkari Saghatana Sugarcane Protest: ऊसाची पहिली उचल 4200 रुपये मिळावी यासाठी स्वाभिमानी पश्चिम महाराष्ट्रात रस्त्यावर उतरली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गेल्या 45 तासांपासून पुणे-बंगळुरू महामार्गावर ठिया आंदोलन सुरू आहे. जर सरकारने वेळीच तोडगा नाही काढला तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. स्वाभिमानीने मुंबईचा दाणापाणी बंद करण्याचा. भाजीपाला आणि दूध जाऊ देणार नाही असा इशारा बुधवारी दिला होता. शेतकऱ्यांची दिवाळी जर महामार्गावर होणार असेल तर तुमचा शिमगा केल्याशिवाय राहणार नाही असा खणखणीत इशाराच राजू शेट्टी यांनी दिला आहे.
पुणे-बंगळुरू महामार्ग ठप्प
पुणे-बंगळुरू महामार्ग गेल्या 45 तासांपासून ठप्प आहे. या आंदोलनाचा मोठा फटका मालवाहतुकीवर झाला आहे. देशभरात जाणारा माल रस्त्यावरच अडवण्यात आल्याने बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. साताऱ्यापासून ते कागलच्या पुढे कर्नाटक हद्दीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या महामार्गावर 4 हजारांहून अधिक वाहनं अडकून पडली आहेत. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग हा कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंतच्या मालवाहतुकीतील प्रमुख महामार्ग आहे. या महामार्गावरून रोज 25 हजारांवर मालवाहतूक वाहनं धावतात. ऐन दिवाळीच्या तोंडावर अवजड वाहतूक ठप्प झाल्याने मालवाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
विवेकानंद पाटील आंदोलनस्थळी
यावर्षी उसाला साडेचार हजार रुपये पहिली उचल मिळावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गेल्या दोन दिवसापासून पुणे बंगळुरू महामार्गावरील किनी टोल नाका इथं महामार्ग रोको आंदोलन सुरू आहे. MPSC आंदोलनाच्या माध्यमातून राज्यभर पोहोचलेल्या विवेकानंद पाटील यांनी या शेतकरी संघटनेच्या आंदोलन स्थळी भेट दिली. आपल्या नेहमीच्या शैलीत त्याने या ऊस दरावर तोडगा काढण्यासाठी सरकारला चर्चेचा आवाहन केलं आहे. विवेकानंद पाटील याला ऐकण्यासाठी हजारो शेतकरी रात्री उशिरापर्यंत आंदोलन स्थळी थांबून होते.
तर ऊस दर आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी शेतकरी व कारखानदार यांची तत्काळ बैठक घेण्याची मागणी रक्षक प्रतिष्ठान संघटनेच्या वतीने अध्यक्ष मनोज माळी यांनी सातारा जिल्हअधिकारी व खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे केली आहे. ऊस दराबाबत तोडगा न निघाल्यास शेतकऱ्यांसोबत रक्षक प्रतिष्ठाणही रस्त्यावर उतरेल असा इशारा जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांनी दिला आहे.
वाहतुकीसाठी या मार्गाचा वापर करा
स्वाभिमानीच्या आंदोलनाने पुणे-बंगळुरू महामार्ग ठप्प झाला आहे. प्रशासनाने वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग सुरू केले आहेत. कोल्हापूरहून लक्ष्मी टेकडी, कागल एमआयडीसी, शिरोली, सांगली फाटा, पेठ नाका, इस्लामपूर, आष्टा, सांगली, रहिमतपूरमार्गे साताऱ्याकडे वाहतूक वळवण्यात आली आहे. तर कोल्हापूर-सांगली-सोलापूरमार्गे पुणे आणि कर्नाटककडे तर कोल्हापूरमार्गे रत्नागिरी-मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरू आहे. पण मालवाहू वाहनं अद्यापही अडकून पडलेली आहेत.