दुष्काळात तेरावा महिना! चोरट्यांचा सुळसुळाट; चारचाकी आणि दुचाकीवरून येत 20 बकऱ्या पळवल्या

सध्या समोर येत असलेल्या घटनांमुळे शेतवस्त्या असुरक्षित असल्याचं चित्र समोर येत आहे. गंगापूर तालुक्यात तब्बल 12 जणांच्या टोळीने चाकूच्या धाकावर 20 बकऱ्या चोरल्याचा प्रकार समोर आला आहे.. यामुळे शेतकरी आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

दुष्काळात तेरावा महिना! चोरट्यांचा सुळसुळाट; चारचाकी आणि दुचाकीवरून येत 20 बकऱ्या पळवल्या
Gangapur
| Updated on: Nov 22, 2026 | 1:36 PM

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आता पणी मिळणं फार कठीण झालं आहे. सांगायचं झालं तर, जिल्ह्यात एकीकडे भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना दुसरीकडे ग्रामीण भागातील शेतवस्त्यांवर चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. याठिकाणी चोरीच्या प्रमाणात दिवसागणिक वाढ होत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, गंगापूर तालुक्यातील शंकरपूर शिवारात अज्ञात चोरट्यांच्या टोळीने चाकूचा धाक दाखवून तब्बल 20 बकऱ्या चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 22 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडल्याने परिसरातील शेतकरी आणि पशुपालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

शंकरपूर शिवारातील शेतकरी विष्णुपंत बन्सीधर पाटील पोळ यांच्या शेतात कैलास रामचंद्र गायकवाड हे काम करतात. मध्यरात्री सर्वजण गाढ झोपेत असताना 10 ते 12 अज्ञात चोरट्यांच्या टोळीने शेतावर धाड टाकली. चोरट्यांनी कैलास गायकवाड यांना चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली आणि गोठ्यातील 20 बकऱ्या बळजबरीने चोरून नेल्या. या चोरीसाठी चोरट्यांनी चारचाकी वाहन आणि दुचाकीचा वापर केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.

Loading...

पोलीस सध्या संबंधित प्रकरणाची कसून चौकशी करत आहे. परिसरात दुष्काळामुळे आधीच शेतीचं मोठं नुकसान झालं असून, शेतकरी आणि पशुपालक गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा कठीण परिस्थितीत उपजीविकेचे प्रमुख साधन असलेल्या पशुधनावरच चोरट्यांनी डल्ला मारल्याने पशुपालक हवालदिल झाले आहेत. शेतवस्तीवर राहणाऱ्या नागरिकांच्या आणि जनावरांच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आला आहे.

या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, पोलिसांनी तातडीने रात्रीची गस्त वाढवावी आणि या चोरट्यांच्या टोळीचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून केली जात आहे. आता याप्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us