
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पार्थ पवार यांच्या जमीन खरेदी व्यवहाराचं प्रकरण गाजत आहे. पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपूत्र आहेत. त्यांच्या अमोडिया कंपनीने पुणे कोरगाव पार्कमध्ये एक जमीन व्यवहार केला. हा जमीन व्यवहार वादात सापडला आहे. कारण बाजार भावानुसार 1800 कोटी रुपये मूल्य असलेली जमीन फक्त 300 कोटी रुपयात दिली, असा आरोप झाला. त्यात मुद्रांक शुल्कापोटी काही कोटी रुपये भरणं अपेक्षित होते. पण तिथेच स्टॅम्प ड्युटी फक्त 500 रुपये भरली गेली असा आरोप झाला. या जमीन व्यवहाराने अजित पवार यांच्या राजकीय अडचणी वाढवून ठेवल्या. अखेर काल हा जमीन व्यवहार रद्द करत असल्याचं अजित पवार यांनी जाहीर केलं.
यावरुन राज्याच्या राजकारणात विविध मत व्यक्त होत असताना शरद पवार यांनी स्पष्टपणे या मुद्यावर आपलं मत मांडलं आहे. पार्थ पवार हे शरद पवार यांचे नातू आहेत. पार्थ पवार पुणे जमीन व्यवहार प्रकरणात चौकशी करुन वास्तव समाजासमोर ठेवलं पाहिजे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. पार्थ पवार प्रकरणी सुप्रिया सुळे यांनी अप्रत्यक्षपणे सौम्य भूमिका घेतली होती. त्यावर हे सुप्रिया सुळेंच व्यक्तिगत मत असू शकतं, असं शरद पवार म्हणाले. यावेळी शरद पवारांना पत्रकारांनी, अमोडिया कंपनीत 1 टक्के भागीदारी असलेल्या दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होतो, पण 99 टक्के शेअर असलेल्या पार्थ पवारांवर गुन्हा नाही, असं का? हा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी याचं उत्तर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसच देऊ शकतील असं शरद पवार म्हणाले.
कर्जमाफीबद्दल घोषणा प्रत्यक्ष कृती नाही
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या विषयावर बोलताना कर्जमाफीबद्दल घोषणा प्रत्यक्ष कृती नाही असं शरद पवार यांनी सांगितलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅटने मतदान घेतल्यास शंका राहणार नाही, असं ते म्हणाले. कुटुंब आणि राजकारण या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी असल्याचही शरद पवारांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेण्याबाबत महाविकास आघाडीने एकत्र बसून निर्णय घ्यावा असं शरद पवार म्हणाले. कारण मनसेला महाविकास आघाडीत घेण्यास काँग्रेसचा विरोध आहे.