शरद पवारांना नेमका त्रास काय? डिस्चार्ज कधी मिळणार? सुप्रिया सुळेंनी दिली मोठी अपडेट

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना छातीत संसर्ग झाल्यामुळे पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती आता कशी आहे आणि सुप्रिया सुळे यांनी काय माहिती दिली, हे जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा

शरद पवारांना नेमका त्रास काय? डिस्चार्ज कधी मिळणार? सुप्रिया सुळेंनी दिली मोठी अपडेट
sharad pawar
| Updated on: Feb 10, 2026 | 9:04 AM

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना खोकल्याचा आणि कफचा त्रास सुरु आहे. त्यामुळे त्यांना रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आता शरद पवारांची प्रकृती कशी आहे? त्यांना नेमकं काय झालं आहे? त्यांना उपचारासाठी किती वेळ लागणार? याबद्दलची एक नवीन माहिती समोर आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत याबद्दलची माहिती दिली आहे. तसेच शरद पवारांवर उपचार करणारे डॉ. लोढा यांनीही त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली आहे.

शरद पवारांची प्रकृती कशी?

रुबी हॉल क्लिनिकचे फिजीशियन डॉ. अभिजीत लोढा यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांना छातीत संसर्ग (Chest Congestion) झाला आहे. त्यामुळे त्यांना खोकल्याचा त्रास जाणवत होता. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या आहेत. सध्या त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर असून काळजी करण्याचे कारण नाही.

शरद पवार यांना अतिदक्षता विभागात (ICU) ठेवण्यात आलेले नाही. ते सध्या रुग्णालयातील एका खाजगी रूममध्ये असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. ते सध्या सर्वांशी व्यवस्थित संवाद साधत आहेत आणि त्यांचे ऑक्सिजन लेव्हल व इतर पॅरामीटर्स सामान्य आहेत, असेही डॉ. अभिजीत लोढा यांनी म्हटले.

सुप्रिया सुळे ट्वीट करत काय म्हणाल्या?

खासदार सुप्रिया सुळे यांनीही त्यांचे वडील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करून शरद पवारांच्या उपचारांबद्दल अधिक स्पष्ट माहिती दिली आहे. बाबांना छातीत संसर्ग झाला असून त्यांना ५ दिवसांच्या अँटीबायोटिक्सचा कोर्स (Antibiotics Course) पूर्ण करावा लागणार आहे. सुदैवाने, इतर सर्व शारीरिक रिपोर्ट्स सामान्य आले आहेत. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि पाठिंब्याबद्दल मी मनापासून आभारी आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

supriya sule

प्रकृती बिघडण्याचे कारण?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांचे दौरे आणि भेटीगाठींचे सत्र सतत सुरु होते. वयोमानानुसार झालेली दगदग आणि हवामानातील बदल यामुळे त्यांना हा त्रास जाणवला असावा, असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. बारामती येथील निवासस्थानी असताना श्वास घेण्यास काहीसा त्रास जाणवू लागल्याने त्यांना तातडीने पुण्यात हलवण्यात आले. डॉक्टरांच्या मते, सध्या सुरू असलेल्या अँटीबायोटिक्स कोर्सचा परिणाम पाहून आणि सर्व चाचण्यांचे अंतिम रिपोर्ट आल्यावरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल.