राज-उद्धव एकत्र आले तर मुंबई मनपा निवडणुकीत काय होणार? शरद पवार यांनी रोखठोक सांगितले

ठाकरे घराण्यातील दोन बंधू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? त्यावर शरद पवार यांनी वेगळ्या पद्धतीने आपले मत मांडले. दोन्ही भावांमधील फरक त्यांनी सांगितला. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मत मांडले.

राज-उद्धव एकत्र आले तर मुंबई मनपा निवडणुकीत काय होणार? शरद पवार यांनी रोखठोक सांगितले
शरद पवार, राज ठाकरे, उद्धव ठाकरे
Jitendra Zavar | Updated on: Jun 07, 2025 | 11:29 AM

राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंवर चर्चा सुरु आहे. राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे. शिवसेना उबाठा नेते आणि खासदार संजय राऊत यांच्याकडूनही वारंवार उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याचे सांगितले जात आहे. उद्धव ठाकरे यांनीही शुक्रवारी जनतेच्या मनात जे आहे, तेच होईल, असे सांगत संकेत दिले. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि राज्यातील राजकारणाचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे शरद पवार यांनी मत व्यक्त केले. त्यांनी राज ठाकरे यांच्या सभांना गर्दी होते, मात्र गर्दीचे रुपांतर मतांमध्ये होत नाही, असे स्पष्टपणे पवार यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले शरद पवार?

राज ठाकरे- उद्धव ठाकरे एकत्र आले तर मुंबई महानगर पालिकेत काय परिस्थिती असेल? असा प्रश्न शरद पवार यांना अनौपचारिक चर्चेत विचारण्यात आला. त्यावर शरद पवार यांनी स्पष्टपणे मत मांडले. ते म्हणाले, आतापर्यंतचा अनुभव असा आहे की, राज ठाकरे यांच्या सभांना गर्दी होते. मात्र त्या गर्दीचे मतांमध्ये परिवर्तन होत नाही. मनसेला मते मिळत नाहीत. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या सभांमध्ये होणारी गर्दी मतांमध्ये परिवर्तत होते. त्यात त्यांना यश येते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ते दिसून आले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका…

शरद पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात मत व्यक्त केले. ते म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मविआ म्हणून एकत्र लढल्या पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीमध्ये जागा वाटप व्यवस्थित होईल, असे वाटत नाही. त्याचा फायदा मविआला मिळू शकतो.

राहुल गांधी यांचा लेख…

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत लेख लिहिला आहे. त्या लेखात महाराष्ट्रातील निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. त्यावर शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणाले, राहुल गांधी यांचा लेख अजून मी वाचला नाही. पण बाजूला काढून ठेवला आहे. संध्याकाळी शांततेत वाचणार आहे.

Follow Us