Rohit Pawar : रोहित पवारांनी ऐनवेळी अजितदादांच्या विषयावरची पत्रकार परिषद पुढे ढकलली, येत्या 10 ऑक्टोंबरला ‘मफलरीं’चे कुठले खुलासे होणार?
Rohit Pawar : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी अजित पवारांसंदर्भातील पत्रकार परिषद पुढे ढकलली आहे. रोहित पवारांनी अजित पवारांना उद्देशून भावनिक ट्विट केलं.

अक्षय मंकणी, प्रतिनिधी : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी अजित पवारांसंदर्भातील पत्रकार परिषद पुढे ढकलली आहे. रोहित पवारांनी अजित पवारांना उद्देशून भावनिक ट्विट केलं. “तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव सुना सुना” असल्याचं त्यांनी म्हटलं.अजित पवारांसाठीचा आपला लढा थांबलेला नसल्याचंही रोहित पवारांनी स्पष्ट केलं.
येत्या 10 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन काही ‘मफलरीं’चे खुलासे करणार असल्याचं रोहित पवारांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. निवडणूक आयोगाबाबत देशपातळीवर आणि राज्यातील दुष्काळाच्या परिस्थितीमुळे आजची पत्रकार परिषद पुढे ढकलल्याचं त्यांनी सांगितलं. रोहित पवार आता 10 ऑक्टोंबरच्या पत्रकार परिषदेत काय नवीन खुलासे करणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. अजित पवार यांचं यावर्षी 28 जानेवारीला विमान अपघातात निधन झालं होतं. त्यानंतर रोहित पवार यांनी सातत्याने हा मुद्दा लावून धरला आहे.
रोहित पवारांनी आज दुष्काळी परिस्थितीवर पत्रकार परिषद घेतली. “शेतकऱ्यांना सगळी मदत करण्याची जबाबदारी ही या सरकारची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं सरसकट पंचमाने हे झाले पाहिजेत. खत,पोट्याश,पेट्रोल आणि डिझेल अशा सगळ्यांची भाव वाढ झाली आहे आणि सगळ्या वस्तू या दुपटीने वाढल्या आहेत. शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्च हा वाढला आहे. पण गेल्या 10 वर्षात पिकांचे भाव काही वाढले नाहीत आणि सोयाबीन आमचा चार रुपयाच्या वर कधी गेला नाही.
शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. त्याला मदत करण्याची गरज आहे आणि हे सरकारने ते करावं. शेतकरी सध्या सावकाराकडून पैसे ऊसने घेतात आणि त्यांच्या कर्जाच्या बोज्याखाली शेतकरी भरडले जातात” असं रोहित पवार म्हणाले.
हा मुद्दा लावून धरला
अजित पवार विमानाने मुंबईहून बारामतीला चालले होते. त्यावेळी लँडिंगच्यावेळी हे विमान क्रॅश झालं होतं. या दुर्घटनेत अजित पवारांसह चौघांचा मृत्यू झाला होता. रोहित पवार यांनी सातत्याने पत्रकार परिषदा घेऊन हा मुद्दा लावून धरला आहे. अजित पवार व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवास करत होते. कंपनीच्या मालकाचा सत्ताधाऱ्याशी संबंध असल्याचे दावे करत रोहित पवार यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. विमानातील अतिरिक्त इंधन, ब्लॅकबॉक्स डॅमेज अशा अनेक गोष्टींवर बोट ठेवतनाच रोहित पवार यांनी अपघाताच्या चौकशीला का विलंब होतोय? असा सवाल उपस्थित केला.