शरद पवार यांची रुग्णालयातून पहिली पोस्ट, दोन दिवसानंतर काय म्हणाले? पहिल्यांदाच व्यक्त केली खंत?

रुग्णालयात दाखल झाल्यानंतर महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी खंत व्यक्त केली आहे. आता त्यांची पोस्ट नेमकी काय आहे जाणून घ्या...

शरद पवार यांची रुग्णालयातून पहिली पोस्ट, दोन दिवसानंतर काय म्हणाले? पहिल्यांदाच व्यक्त केली खंत?
शरद पवार
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Apr 21, 2026 | 7:17 PM

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल आहेत. नियमीत तपासणीसाठी त्यांना दिल्लीहून आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचार घेत असल्यामुळे त्यांनी बारामती दौरा देखील रद्द केला. त्यानंतर आता शरद पवार यांनी रुग्णालयातून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी खंत व्यक्त केली आहे.

काय आहे पोस्ट?

शरद पवार यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर ही पोस्ट केली आहे. पोस्टच्या सुरुवातीला ते म्हणाले की, “मी १९६७ मध्ये लढविलेल्या पहिल्या निवडणुकीपासून बारामती मतदारसंघातील माझ्या मतदानाचा हक्क अखंडपणे बजावला. आता २०२६ मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्राचे एक लाडके व लोकप्रिय नेते स्व. अजित पवार यांच्या दुर्दैवी, अपघाती निधनाच्या शोकात्म पार्श्वभूमीवर ही पोटनिवडणुक होत आहे.”

पुढे ते म्हणाले की, “या पोटनिवडणुकीसाठी बारामती येथे येऊन आतापर्यंतच्या प्रघातानुसार मतदान करण्याचे मी ठरवले होते. दुर्दैवाने माझी प्रकृती बिघडल्याने मला मुंबईत रुग्णालयात दाखल व्हावे लागले. डॉक्टरांनी मला उपचार आणि सक्तीची विश्रांती या कारणास्तव मुंबईबाहेर जाण्यास मनाई केली आहे. त्यामुळे अत्यंत नाईलाजास्तव मतदानाचा हक्क बजावण्यापासून मला वंचित रहावे लागत आहे, हे मी अत्यंत व्यथित आणि खेदपूर्ण अंत:करणाने सांगू इच्छितो. माझ्यावर अथक प्रेम व विश्वास असलेले बारामतीचे नागरिक, मतदार व कार्यकर्ते मला समजुन घेतील याची मी खात्री बाळगतो.”

पोस्टच्या शेवटी शरद पवार म्हणाले की, “आमच्या पक्षाने (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार) या पोटनिवडणुकीत श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना पाठिंबा जाहिर केला आहे. स्व. अजित पवार यांना ही एकप्रकारे आमच्या पक्षातर्फे श्रद्धांजलीच आहे. माझे बारामतीमधील सर्व मतदारांना आवाहन आहे की, त्यांनी श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करून स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करावी. बारामतीमधील मतदार यांनी माझ्यावर प्रदीर्घ विश्वास ठेवलेला आहे. ते या आवाहनास प्रतिसाद देतील, असा मला विश्वास आहे. मतदानासाठी प्रत्यक्ष न येता निवडणुक आयोगाच्या विविध पर्यायांचा देखील मी तपास केला व विचारणा केली. परंतु ते पर्याय उपलब्ध नसल्याचे राज्याच्या निवडणुक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. अखेर अतिशय व्यथित व जड अंत:करणाने मला मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय करावा लागला. या पोटनिवडणुकीत श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करावे, असे मी बारामतीकरांना पुन्हा एकदा आवाहन करतो.”

Follow Us