
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या एका कार्यकर्त्याचं अपहरण करून, त्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शरणू हांडे असे मारहाण करण्यात आलेल्या कार्यकर्त्याचं नाव आहे. शरणू हांडे यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमित सुरवसे याच्यावर शरणू हांडे यांच्या अपहरणाचा तसेच त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे, पोलिसांनी या प्रकरणात अमित सुरवसे आणि त्याच्या 6 साथीदारांना अटक केली आहे, दरम्यान त्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी रुग्णालयात जाऊन शरणू हांडे यांची भेट घेतली, त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान गोपिचंद पडळकर यांच्या आरोपांनंतर रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
हांडे आणि सुरवसे हे मित्र आहेत. एकमेकांना ते फार पूर्वीपासून ओळखतात. मात्र राजकीय दृष्टीकोनातून त्यांच्यामध्ये अनेकदा वाद झालेले आहेत. अमित सुरवसेला 30 जून रोजी फार भयानक पद्धतीनं मारलं होतं, त्याचे व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आले होते, त्याला फार खालच्या लेव्हला जाऊन बोललं गेलं होतं, आणि त्यामुळे तो मनातून दुखावला होता. आता आमच्या सर्वांचं म्हणणं असं आहे की कालच्या प्रकरणाला जर अमित सुरवसे जबाबदार असेल तर त्याच्यावर कारवाई व्हावी, पण त्याच्यावर कलम टाकत असताना तुम्ही कुठले कलम टाकत आहात, हे सुद्धा पोलिसांनी सांगितलं पाहिजे. 30 जूनला अमित सुरवसे या कार्यकर्त्याला ज्या पद्धतीनं मारलं गेलं, त्याचे व्हिडीओ लोकांसमोर आले आहेत. मग तुम्ही ज्या पद्धतीची कारवाई ही सुरवसेंवर करणार आहात, त्याच पद्धतीची कारवाई तुम्ही हांडेवर करणार आहात का? असा प्रश्न आम्ही सर्वजण करतो.
काल जेव्हा ही घटना घडली होती, आणि आज तिथे जे पडळकर गेले होते, पडळकरांसोबत काही लोक होती, त्याच्यामध्ये शरण हांडेच्या कानात एक माऊल हवणार नावाचा कार्यकर्ता काय बोलतो? याचा एक फोटो आहे, व्हिडीओ आहे. तो काय बोलला? त्याच्यानंतर अचानकच या हांडेंनी माझं नाव तिथे घेतलं. हा जो माऊली हवणार आहे, हा भाजपचा कार्यकर्ता आहे. तो किसान सेलचा भाजपचा पदाधिकारी आहे. तो हांडेच्या कानात काहीतरी सांगतो आणि हांडे लगेचच माझं नावं घेतो, या सर्वांमध्ये मुद्दामहून मला फ्रेम करण्याचा प्रयत्न केला जात आहे का? असा आमच्या सर्वांचा सवाल आहे, असं यावेळी रोहित पवार यांनी म्हटलं आहे.