आधी दोन महिने देणार होतो पण आता एकही मिनिट देणार नाही, अन् जरांगे पाटील प्रचंड संतापले

मोठी बातमी समोर येत आहे, मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे, आज जरांगे पाटील यांची शिंदे समितीनं भेट घेतली, यावेळी आरक्षणासंदर्भात चर्चा झाली.

आधी दोन महिने देणार होतो पण आता एकही मिनिट देणार नाही, अन् जरांगे पाटील प्रचंड संतापले
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 30, 2025 | 4:13 PM

मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलन सुरू झालं आहे, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत, मुंबईतील आझाद मैदान इथे त्यांचं उपोषण सुरू आहे. आज त्यांची शिंदे समितीनं भेट घेतली, मात्र या भेटीवरून त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे, खरतर सरकार भेटीसाठी येणं अपेक्षित होतं असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?  

खरं तर सरकार येणं अपेक्षित होतं. शिंदे समिती येणं अपेक्षित नव्हतं. शिंदे समितीला विनाकारण पुढे घालत आहे. आम्ही सांगितलं की सातारा गॅझिटिअरचा सर्व मराठा कुणबी आहे. हैद्राबादच्या गॅझिटेरिअरचा मराठाही कुणबी आहे. त्याची अंमलबजावणी हवी. एक घंटा वेळ देणार नाही. सगे सोयऱ्यांच्याबाबतही तडजोड नाही. मराठा आणि कुणबी एक आहे. ५८ लाख नोंदीचा आधार आहे. जीआर काढा. त्यासाठी ते चर्चा करतो म्हणाले. शिंदे समितीचा विषय आणि केसेसवर कोणतीही तडजोड नाही, असं यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, तुमचा काय संबंध आहे या विषयात? ते तुम्हाला पाठवत आहे. बलिदान दिलेल्या लोकांशी खेळता. मी एक मिनिटंही देणार नाही. दोन महिने देणार होतो. आता तेही देत नाही. बलिदान देणाऱ्यांना नोकरी देत नाही आणि निधीही देत नाही. आमदारांच्या सभेला कोटी रुपये उधळता. बलिदान दिलेल्याच्या कुटुंबाला १० लाख रुपये आणि नोकरी ही त्यांचीच घोषणा आहे. तिथे तडजोड नाही. केसेसही सरसकट मागे घ्या. आमच्यावर हल्ला झाला. आम्ही हल्ला केला नाही. पोलीस अधिकाऱ्यांवर हाफ मर्डरचा गुन्हा दाखल करा. त्यांना बडतर्फ करा, अशी मागणी यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

शनिवार रविवारच्या आत निर्णय झाला नाही तर एकही मराठ्याचं लेकरूबाळ घरी राहणार नाही. महाराष्ट्रातील मराठा घरात दिसणार नाही, असा इशाराही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.