राज्यात मोठ्या घडामोडी! मंत्री प्रताप सरनाईक संजय राऊतांच्या भेटीला, कारण काय?
ऐन दिवाळी राजकीय घडामोडींचे फटाके फुटू लागलेत. ऐन दिवाळीत मंत्री प्रताप सरनाईक आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांच्या भेटीला पोहोचल्याचे समोर आलं आहे.

ऐन दिवाळी राजकीय घडामोडींचे फटाके फुटू लागले आहेत. शिवसेना फुटीनंतर दुरावलेले नेते पुन्हा भेटू लागल्याचे दिसत आहे. शिंदे गटातील मंत्री प्रताप सरनाईक आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांच्या भेटीला पोहोचले आहेत. दोन्ही नेत्यांच्या अचानक भेटीने अनेकांच्या भुवया उंचवाल्या. ऐन दिवाळीत घेतलेल्या या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दोघांच्या भेटीचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
शिवसेना फुटल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटात मोठा दुरावा निर्माण झालाय. दोन्ही गटातील नेत्यांकडून एकमेकांवर कठोर शब्दात आगपाखड केली जात आहे. निवडणुकीच्या मैदानातही दोन्ही गट एकमेकांच्या उभे ठाकले होते. तर दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून एकमेकांवर जोरदार टीका होते. त्यानंतरही दोन्ही गटाच्या नेत्यांची आज दिवाळीनिमित्त भेट झाली. या भेटीवर संजय राऊत म्हणाले, मी घराच्या खाली आल्यावर प्रताप सरनाईक आल्याचे कळाले. मी भेटायला जाईल. आमचे व्यक्तिगत संबंध आहेत. त्यांची आई आणि माझ्या आईचे फार वर्षांपासून जिव्हाळ्याचे संबंध आहेत. दिवाळीचा सण आहे,तर ते येणारच. यामागे कोणतेही संकेत नाहीत. ते येतील लाडू, चकली खातील. त्यांना आवडतो. आईचा आशीर्वाद घेऊन निघून जातील. त्यापलीकडे काही नाही. शिवसेना विलीनीकरणाचं काही नाही. शिंदे गटात दोन शिंदे आहेत. तो तुम्ही शोधा’. दरम्यान, या भेटीने राजकीय वर्तुळात राष्ट्रवादीनंतर शिवसेना विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली आहे.
तत्पूर्वी, संजय राऊत आणि मंत्री प्रताप सरनाईक यांच्यातील संवादाचा पूल कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. रिक्षाचालक आणि रॅपिडो बाईक टॅक्सीमधील वाद सुरू होता. अनेक रिक्षाचालक संघटनांनी रॅपिडो बाईक टॅक्सीमुळे हजारो रिक्षाचालकांवर संकट येत असल्याचा दावा केला होता. त्यावेळी रिक्षाचालकांच्या शिष्टमंडळाने प्रताप सरनाईक यांची भेट घेतली होती. त्यानंतर प्रताप सरनाईक यांनी लवकरच याबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले होते. या भेटीनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांचं कौतुक केलं होतं.