जागा वाटपावरुन शिंदेंचे मंत्री आणि आमदार आक्रमक! काय आहे शिंदेंच्या मंत्र्यांची मागणी?

महायुतीत आणखी काही जागांचा तिढा कायम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री आणि आमदार जागावाटपावरुन आक्रमक झाले आहेत. शिवसेनेच्या जागा देऊ नका अशी त्यांनी मागणी आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात या जागांवरुन रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.

जागा वाटपावरुन शिंदेंचे मंत्री आणि आमदार आक्रमक! काय आहे शिंदेंच्या मंत्र्यांची मागणी?
shinde MLA
| Updated on: Apr 06, 2024 | 10:00 PM

Loksabha election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत जागा वाटपावरुन शिंदेंचे मंत्री आणि आमदार आक्रमक झाल्याची माहिती आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पालघर आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागा सोडू नका अशी मागणी शिंदेंच्या मंत्र्यांनी केली आहे. आपल्या जागा सोडू नका, यावर मंत्री आणि आमदारांनी मुख्यमंत्र्यांसमोर आक्रमक भूमिका घेतली आहे.

आपलेच मतदारसंघ कसे जात आहे, मित्रपक्षांचे मतदारसंघ आपल्याला मिळावेत, अशी रोखठोक भूमिका मंत्र्यांनी घेतली आहे. तसंच संजय निरुपमांना पक्षात घेण्यावरुन एकमत झालं असून 48 तासांत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. एक मोठा नेता आणि अनेक आमदार संपर्कात असल्याची चर्चाही बैठकीत झाली आहे.

शिवसेनेचे १० उमेदवार जाहीर

शिंदेंच्या शिवसेनेकडून आतापर्यंत 10 उमेदवारांची घोषणा झाली आहे. त्यात 3 विद्यमान खासदारांचा पत्ता कट झाला आहे. आणखी 3-4 जागा शिंदेंच्या शिवसेनेला मिळू शकतात. त्यावरुन बैठकीनंतर शिरसाटांनीही भाष्य केलं आहे. भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत असल्याचं शिरसाटांनीच म्हटलं आहे.

नाशिक आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या दोन मतदारसंघावरुन भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरु आहे. नाशिकमध्ये विद्यमान खासदार हेमंत गोडसेंचं तिकीट निश्चित झालेलं नाही. इथं अजित पवार गटाच्या भुजबळांना उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चा आहे. त्यातच मुख्यमंत्री शिंदेंनी, गोडसेंना मुंबईत बोलावून घेतलं आहे.

भुजबळांच्या उमेदवारीला शिवसेनेत विरोध

मला तिकीट मिळाल्यास भुजबळही माझं काम करतील आणि भुजबळांना तिकीट मिळाल्यास मी मदत करेल असं गोडसे म्हणत असले तरी शिंदेंच्या शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरींनी भुजबळांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. भुजबळांना उमेदवारी मिळाल्यास शिवसैनिक काम करणार नाही, असा इशारा चौधरींनी दिला आहे.

4 ते 5 जागांचा तिढा अजूनही महायुतीत कायम आहे. त्या जागांवरुन शिंदेंनी मंत्री आणि नेत्यांची बैठक घेतली. पण आपल्या जागांवर ठाम राहायचं हीच भूमिका शिंदे गटानं घेतल्यानं, तिढा नेमका कसा सुटेल हे पाहणं महत्वाचं असेल.