पंकजा मुंडे यांच्या पराभवाने चर्चेत आलेल्या बीडमध्ये ‘या’ महिला नेत्याची एन्ट्री, विधानसभा लढवण्याची घोषणा; टेन्शन कुणाला?

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभा मतदासंघात पराभव झाला. पंकजा मुंडे यांचा पराभव होईल, असं फार कमी वाटत होतं. कारण तिथे गेल्या 10 वर्षांपासून त्यांच्या बहीण प्रीतम मुंडे या खासदार होत्या. पण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी त्यांचा पराभव केला. ही निवडणूक अतिशय अटीतटीची ठरली. मतमोजणीच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कोण जिंकेल? याबाबतचा सस्पेन्स कायम होता. अखेर पंकजा यांचा या निवडणुकीत पराभव झाला. या पराभवानंतर आता बीडमध्ये आणखी एका महिला नेत्याची एन्ट्री झाली आहे. या महिला नेत्याने बीड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे.

पंकजा मुंडे यांच्या पराभवाने चर्चेत आलेल्या बीडमध्ये या महिला नेत्याची एन्ट्री, विधानसभा लढवण्याची घोषणा; टेन्शन कुणाला?
भाजप नेत्या पंकजा मुंडे
| Updated on: Jun 13, 2024 | 6:45 PM

महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात ट्विस्ट येण्याचे संकेत आहेत. कारण बीडमध्ये मोठ्या घडामोडी घडणार आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय. या पराभवानंतर पंकजा मुंडे या विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार का? हे आगामी काळात स्पष्ट होईल. पंकजा याआधी बीडच्या परळी विधानसभा मतदारसंघाच्या आमदार होत्या. पण सध्या तिथे राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे हे आमदार आहेत. बीड विधानसभा मतदारसंघात सध्या शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर हे आमदार आहेत. त्यांचा कार्यकाळ आता पुढच्या सहा महिन्यांनी संपणार आहे. त्याआधी राज्यात विधानसभेची निवडणूक होईल. या निवडणुकीत बीड विधानसभा मतदारसंघातून शिवसंग्राम संघटनेचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे या निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. तसेच शिवसंग्राम अनेक जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.

विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासाठी काम केलं आहे. त्यांच्या पक्षाकडून सातत्याने त्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. आता मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. विशेष म्हणजे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आता एक महिन्याचा अल्टिमेटम देखील दिला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठीचं वातावरण तापलेलं राहिलं तर शिवसंग्राम पक्षाला त्याचा मोठा फायदा होऊ शकतो.

ज्योती मेटे नेमकं काय म्हणाल्या?

“कोणतीही निवडणूक आणि त्याचा निकाल एकाचा विजय आणि दुसऱ्याचा पराभव असाच पहावा लागतो. लोकसभा निवडणूक लढवीत असताना त्याचे समीकरण उमेदवारागणिक बदलले जातात. शिवसंग्रामने केवळ बीड लोकसभेपुरता नाही तर राज्यभरात तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला होता. खासदार बजरंग सोनवणे यांना फायदा झाला हे त्यांचे मत असू शकते”, असं ज्योती मेटे म्हणाल्या.

“विधानसभा निवडणुकीत आमच्याकडे सर्व पर्याय खुले आहेत. शिवसंग्रामला दोन तपाचा इतिहास आहे. राज्यभरात आमच्या कार्यकर्त्यांचे जाळे आहे. विनायक मेटे यांच्या निधननंतर देखील कार्यकर्ते त्याच उमेदीने कार्य करत आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत स्वतंत्र लढायच की कोणासोबत युती करायची हे काळानुसार ठरवू”, असं सूचक वक्तव्य ज्योती मेटे यांनी केलं आहे.

‘मी बीड विधानसभा निवडणूक लढणार’

“आगामी विधानसभा निवडणूक शिवसंग्राम पूर्ण ताकतीने राज्यभरात लढणार आहे. मी बीड विधानसभा निवडणूक लढणार आहे”, असं ज्योती मेटे म्हणाल्या आहेत. “40 वर्षांपासून बीडमध्ये अभिप्रेत असा विकास झाला नाही, याच मुद्द्यावर बीड विधानसभा निवडणूक लढणार आहे. कोणतीही निवडणूक दोन समजपुरती नसते. मतदार हा मतदारच असतो. जातीपातीच्या पलीकडे जाऊन या निवडणुकीकडे पाहायला हवं, आणि आपला सलोखा कायम राखायला हवा”, अशी भूमिका ज्योती मेटे यांनी मांडली आहे.

“मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने जानेवारी महिन्यातच अधिसूचना काढली होती. त्यावर निर्णय घेणं सरकारचं कर्तव्य आहे. शासन म्हणून त्यांनी ते पार पाडलं पाहिजे. राजकारणातल्या काही गोष्टी लगेच उघड करायच्या नसतात”, असं ज्योती मेटे म्हणाल्या.

“भाजप नेत्या पंकजा मुंडे आभार दौरा काढत आहेत. अतिशय स्तुत्य उपक्रम आहे, असं मी म्हणेल. 30 जून रोजी दिवंगत विनायक मेटे यांची जयंती आहे. त्यादिवशी अभिनव संकल्प राबविणार आहे. 30 तारखेला आम्ही आमची संकल्पना जाहीर करणार आहोत”, अशी माहिती ज्योती मोटे यांनी दिली.