एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यासाठी अधिकारी काम करताय ? कुणी केला आरोप

शिवसेनेने बुक केलेल्या बसेस शिंदे गटाला देण्यासाठी ते आरटीओ अधिकारी काम करीत असल्याचा आरोप सुधाकर बडगूजर यांनी केला आहे.

एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यासाठी अधिकारी काम करताय ? कुणी केला आरोप
Image Credit source: FACEBOOK
| Updated on: Oct 04, 2022 | 1:33 PM

चंदन पूजाधिकारी, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, नाशिक : नाशिकच्या शिवसेना (Shivsena) महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी एका आरटीओ (RTO) अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केला आहे. थेट रेकॉर्डिंग असल्याचा दावा करत अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी केली आहे. ठाकरे गटाच्या वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्याला एका आरटीओ अधिकाऱ्याने फोन करून बसेस देण्याची मागणी केली आहे. त्यात मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काम करत असल्याचा दावा बडगुजर यांनी केला आहे. इतकंच काय तर शासन कोणतेही असो, प्रशासनाने त्यांचे काम केले पाहिजे. दसरा मेळाव्याकरिता बसेसची मागणी अधिकारी करीत असेल तर हे चुकीचे आहे. त्यांना तात्काळ निलंबित केले पाहिजे अशी मागणी नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगूजर यांनी केली आहे.

याशिवाय शिवसेनेने बुक केलेल्या बसेस शिंदे गटाला देण्यासाठी ते आरटीओ अधिकारी काम करीत असल्याचा आरोप सुधाकर बडगूजर यांनी केला आहे.

खरंतर नाशिकमधील शिवसेनेचे असलेले दोन्हीही आमदार आणि एक खासदार शिंदे गटात गेले असले तरी पदाधिकारी आणि कार्यकर्ते ठाकरे गटासोबत आहे.

त्यामुळे नाशिकमधील ठाकरे आणि शिंदे गटातील कुरघोडी वारंवार समोर येत असून मातोश्रीवर जाऊन पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंना एकनिष्ठ असल्याचा विश्वासही दिला होता.

त्यामुळे नाशिकमधून शिवसैनिकांची दसरा मेळाव्यात असायला हवी यासाठी दोन्ही गट शर्तीचे प्रयत्न करीत असतांना बडगूजर यांनी गंभीर आरोप केला आहे.

आरटीओ अधिकारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दमदाटी करीत असून वेळ पडल्यास पुरावे सादर करू असेही बडगूजर यांनी म्हंटले आहे.

एकूणच बडगूजर यांनी केलेल्या आरोपावरून नाशिकच्या शिवसेना वर्तुळात खळबळ उडाली असून बडगूजर यांच्या आरोपावरुन चर्चेला उधाण आले आहे.