Vinayak Raut | तोंडाला पानं पुसली जातील तेव्हा शिंदे-भाजपमध्ये तुंबळ युद्ध अटळ, शिवसेना खासदार विनायक राऊतांचं वक्तव्य

| Updated on: Jul 15, 2022 | 12:02 PM

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर टीका करताना विनायक राऊत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले तरी त्यांना स्वतःचा व्हॉइस नाही. त्यांचे बोलविता धनी दिल्लीकर आहेत.

Vinayak Raut | तोंडाला पानं पुसली जातील तेव्हा शिंदे-भाजपमध्ये तुंबळ युद्ध अटळ, शिवसेना खासदार विनायक राऊतांचं वक्तव्य
खा. विनायक राऊत
Follow us on

मुंबईः शिवसेनेतून बंडखोरी करत बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या गटातील आमदारांना मंत्रिमंडळ विस्तारात तोंडाला पानं पुसल्या जातील तेव्हा त्यांच्यातील युद्ध अटळ आहे, असा दावा शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केला आहे. मंत्रिमंडळविस्तारात हाती काही लागणार नाही तेव्हा हे अतृप्त आत्मे एकमेकांच्या उरावर बसल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिलाय. शिवसेना (Shivsena) खासदार विनायक राऊत यांनी कोल्हापुरात टीव्ही9 शी बोलताना हे वक्तव्य केलं. भाजप आणि शिंदे गटातील धुसपूस बाहेर यायला फार वेळ लागणार नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तरीही त्यांचा बोलविता धनी दिल्लीत आहे. उपमुख्यमंत्रीपदी बसलेल्या फडणवीसांची खदखद वारंवार दिसून येतेय, असा टोमणाही विनायक राऊतांनी मारला.

भाजपच्या षड्यंत्राबद्दल चीड, उद्रेक होणार

शिवसेनेविरोधात भाजपने रचलेल्या षड्यंत्राबद्दल शिवसैनिकांमध्ये चीड आहे. शिवसेनेतील आमदार विकले गेले असले तरीही शिवसेनेचा पाया हा शिवसैनिक आहे. तो आजही भक्कमपणे उभा आहे, असं विनायक राऊतांनी सांगितलं. या बेईमानी केलेल्या लोकांबद्दल जनतेत चीड आहे. भाजपने रचलेल्या या षड्यंत्राबद्दलही चीड आहे. याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा विनायक राऊतांनी दिला.

ऑगस्टपासून उद्धव ठाकरेंचा जिल्ह्या-जिल्ह्यात दौरा

शिवसेनेतून काही लोक बाहेर पडले तरीही जे उरले आहेत, त्यांच्यासोबत पुन्हा एकदा झेप घेण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतल्याची माहिती विनायक राऊत यांनी दिली. पावसाळा संपल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जिल्हा निहाय दौरा करणार आहेत. 23 जुलैपर्यंत महाराष्ट्रातील पदाधिकारी मुंबईत त्यांची भेट घेण्यासाठी येतील. त्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून उद्धव ठाकरे महाराष्ट्रात दौरे आयोजित करतील, अशी माहिती विनायक राऊत यांनी दिली.

केसरकरांचं बोलणं ही पोपटपंची..

एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांवर टीका करताना विनायक राऊत म्हणाले, दीपक केसरकर बोलतायत ती निव्वळ पोपटपंची आहे. एवढे दिवस ते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासोबत तासन् तास बोलत होते. तेव्हा ही तक्रार केली नाही. मात्र आताच कसं बोलायला सूचतंय, अशी टीका राऊतांनी केली.

फडणवीसांच्या मनात खदखद…

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर टीका करताना विनायक राऊत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले तरी त्यांना स्वतःचा व्हॉइस नाही. त्यांचे बोलविता धनी दिल्लीकर आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या मनातील खदखद माईक खेचण्यातून व्यक्त होते. केंद्रीय नेतृत्वाने फडणवीस यांचा पोपट केलाय. त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. आता सर्वोच्च न्यायालय आम्हाला न्याय देईल तेव्हा 40 आमदारांची दांडी गुल झालेली असेल.. असा इशाराही विनायक राऊत यांनी दिला.